गंगापूरला मोकाट श्वान, वराहांचा उपद्रव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 11:37 PM2019-07-16T23:37:25+5:302019-07-17T00:38:30+5:30
गंगापूर गावात मोकाट श्वान व वराहांंचा सुळसुळाट झाला असून, त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा व आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
गंगापूर : गंगापूर गावात मोकाट श्वान व वराहांंचा सुळसुळाट झाला असून, त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा व आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष करून महापालिका शाळा, देना पाटील विद्यालय, गंगापूर रुग्णालय, बाजार पेठ, अंगणवाडी या भागातच श्वान व वराहांचा वावर अधिक असल्याने त्यांच्या बंदोबस्तासाठी नियुक्तकेलेल्या ठेकेदाराच्या कारभाराविषयी शंका व्यक्त केली जात आहे.
मोकाट श्वान व वराह परिसरात दुर्गंधी व घाण पसरवीत असून, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तक्रार करूनही महापालिकेचे कर्मचारी दुर्लक्ष करत आहेत. परिणामी येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. वराहांमुळे अपघातही झाले आहेत. याबाबत नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी नागरिकांनी संपर्क साधला असता त्यांना, कुठे आहेत ते दाखवा असे दुरुत्तरे दिली जात आहेत. वराहांच्या मालकांना महापालिकेच्या ठेकेदाराकडून अगोदरच पूर्व कल्पना दिली जात असल्यामुळे ज्यावेळी वराह पकडण्यासाठी पथक येते, त्यापूर्वीच वराहांना अज्ञातस्थळी लपवून ठेवले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.