मौलाना बाबा उरुस
By Admin | Published: December 9, 2015 11:02 PM2015-12-09T23:02:35+5:302015-12-09T23:03:32+5:30
ढोलताशांनी दिली सलामी
कसबे सुकेणे : येथील मौलाना बाबांच्या उरूसास बुधवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. दुपारी राज्यभरातील नामवंत ढोलताशांच्या पथकांनी संदलमध्ये भाग घेऊन सलामी दिली.
कसबे सुकेणे येथे ओझर रस्त्यावर मौलाना बाबांची दर्गा असून, सालाबादप्रमाणे यंदाच्या उरूसास संदलने प्रारंभ झाला. कसबे सुकेणे गावातून फातेहा दिल्यानंतर शहरातून संदल मिरवणूक काढण्यात आली. दर्ग्याचे खादीम पुजारी सय्यद अय्युब कादरी, तय्यब गुलाबहुसेन मणियार, अब्दुल गुलाब हुसेन व मौलानाबाबा उरूस व कसबे सुकेणे मुस्लीम पंच कमिटीच्या मान्यवरांच्या हस्ते दर्ग्यावर संदल चढविण्यात आला. यावेळी राज्याच्या विविध भागातून आलेल्या भाविकांनी नवसपूर्ती केली. संदलनिमित्त दर्ग्याला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. आलेल्या भाविकांसाठी वाहनतळ, दर्शन व्यवस्थेची चोख ठेवण्यात आली आहे. कसबे सुकेणे पोलीस उपठाण्याच्या वतीने दर्ग्याच्या परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.
ढोलताशांची जुगलबंदी
या उरूसाचे खास आकर्षण म्हणजे ढोल ताशांची जुगलबंदी आणि देशभरात प्रसिद्ध कवाल्लांची मैफल. सायंकाळी उशिरा दिल्ली येथील चाँद कादरी यांची कवाली ऐकण्यासाठी राज्याच्या विविध भागातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहाटेपर्यंत चालणारी कवालीची मैफलीसाठी नाशिक जिल्ह्याससह परगावच्या भाविकांची गर्दी सायंकाळी
वाढली होती.