आगामी निवडणुकांत महिलांना जास्तीत जास्त संधी - रोहिणी खडसे
By दिनेश पाठक | Published: January 20, 2024 06:24 PM2024-01-20T18:24:59+5:302024-01-20T18:25:35+5:30
केंद्रीय तपास संस्था फक्त विरोधकांनाच त्रास देत असल्याची टीका त्यांनी मोदी सरकारवर केली.
नाशिक : शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली असून जनतेच्या मनात आमचाच मुळ राष्ट्रवादी पक्ष आहे. कोणाचे विचार बदलले म्हणून संपूर्ण पक्ष बदलत नसतो. महिलाविषयक धोरण प्रथम शरद पवार यांनीच आणले. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये देखील महिलांना जास्तीत जास्त प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली जाईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा राेहिणी खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
केंद्रीय तपास संस्था फक्त विरोधकांनाच त्रास देत असल्याची टीका त्यांनी मोदी सरकारवर केली. महिला आघाडीच्या नियुक्त्या तसेच हळदी कुंकु समारंभासाठी खडसे शहरात आल्या होत्या. सायंकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.त्या म्हणाल्या की, महिला संघटन आमचे ध्येय आहे. कोणी पक्षातून बाहेर पडले म्हणजे पक्ष संपत नाही. प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत अजून स्थान मिळत नसल्याबद्दल विचारले असता प्रकाश आंबेडकर आमच्यासोबतच असतील, असा विश्वास त्यांनी दर्शविला. भाजपाने दबावतंत्राच्या माध्यमातून विरोधकांच्या चौकशा लावल्या आहेत, परंतू आम्ही घाबरणारे नाही. चौकशीत काहीच निष्पन्न होत नसताना फक्त घाबरविण्यासाठी अथवा भाजपात येण्यासाठी केंद्रीय तपास संस्थांचा दुरपयोग केला जात आहे. युवतींना पक्षाशी जोडण्याचे काम जोमाने होत असून त्यास राज्यभरात प्रतिसाद मिळत असल्याचे राेहिणी खडसे यांनी सांगितले. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर ओबीसींच्या आरक्षणास धक्का न लागता मराठा समाजास आरक्षण मिळाले पाहीजे, अशी भूमिका त्यांनी विषद केली. पत्रकार परिषेस माजी आमदार दिपीका चव्हाण, महिला आघाडी शहर जिल्हाध्यक्षा अनिता दामले, शहर उपाध्यक्षा कविता पवार, सरला नाडे, ओबीसी सेलचे छबु नागरे, सरचिटणीस मुन्ना अन्सारी, प्रवीण नागरे उपस्थित हाेते.
राम मंदिर उदघाटनाची घाई
राम मंदिराबाबतच्या प्रश्नावर राेहिणी खडसे यांनी भाजपावर संधान साधले. हा सोहळा भाजपाने फक्त इव्हेंटपुरताच केला असल्याची टिका केली. राम मंदिराचे काम हाेत असल्याचा गर्व आम्हालाही आहेच. माझे वडील एकनाथ खडसे कारसेवक होते. राम मंदिर हा विषय अस्मितेचा आहे. आम्हीही रामाच्या दर्शनासाठी अयोद्धेला जाणार आहोत. परंतु मंदिराचे काम अजून ५० टक्क्याच्यावर बाकी असताना उदघाटनाची घाई होत असल्याची टिका त्यांनी केली.