कमाल तपमान @ ३८ : नाशिककरांना वाढत्या ऊन्हाचा चटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 07:19 PM2018-03-26T19:19:25+5:302018-03-26T19:19:25+5:30
मागील तीन दिवसांपासून शहराचे कमाल तपमान वाढत असून सोमवारी पारा थेट ३८ अंशापर्यंत सरकल्याने नाशिककरांच्या अंगाची काहिली झाली. दुपारी एक वाजेपासून चार वाजेपर्यंत नाशिककरांना उन्हाचा तीव्र तडाखा जाणवला.
नाशिक : हंगामातील उच्चांकी कमाल तपमानाची नोंद सोमवारी (दि.२६) शहरात झाली. ३८.१ अंश इतके कमाल तर किमान तपमान १६.६ नोंदविले गेले. या उन्हाळ्यातील सर्वात उच्चांकी तपमान ठरल्याची माहिती हवामान निरिक्षण केंद्राने दिली. पारा वाढल्याने नाशिककरांना उन्हाचा चटका चांगलाच जाणवला.
मागील तीन दिवसांपासून शहराचे कमाल तपमान वाढत असून सोमवारी पारा थेट ३८ अंशापर्यंत सरकल्याने नाशिककरांच्या अंगाची काहिली झाली. दुपारी एक वाजेपासून चार वाजेपर्यंत नाशिककरांना उन्हाचा तीव्र तडाखा जाणवला. रविवारी कमाल तपमानाचा पारा ३७ अंशापुढे सरकला होता; मात्र किमान तपमान कमी असल्याने वातावरणात उष्मा जाणवत नव्हता व उष्ण वातावरण सुर्यास्त होताच तितक्याच वेगाने थंड होत होते. रात्री थंड वाराही काही भागात सुटल्याचे नागरिकांनी अनुभवले; मात्र सोमवारी कमाल व किमान तपमानात वाढ झाल्याने वाऱ्याचा वेग मंदावला व वातावरणात उष्माही जाणवत होता. त्यामुळे रात्रीही नागरिकांना उकाडा सहन करावा लागला. मार्चअखेर कमाल तपमानाचा पारा ४० अंशापर्यंत जाण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. ३१ मार्चपर्यंत उष्ण वातावरण वाढणार असून नागरिकांनी शक्यतो दुपारच्या वेळेस बाहेर पडणे टाळावे, गरज असल्यास बाहेर पडताना उन्हापासून बचावाची योग्य ती खबरदारी घ्यावी. घरातून निघताना भरपूर पाणी पिऊन बाहेर पडावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. पुढील काही दिवसांमध्ये कमाल तपमानाबरोबर किमान तपमानही १८ अंशाच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे. तसेच वातावरणातील आर्द्रताही वाढू शकते, यामुळे नाशिककरांना उकाडा व घामाचा त्रास अधिक सहन करावा लागण्याची शक्यता आहे. वाढत्या उन्हामुळे उष्मा वाढत असून नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन हवामान खात्याकडून केले जात आहे.
शीतपेयांसह टोप्या, स्टोलला मागणी
वाढत्या उन्हामुळे नागरिकांकडून शीतपेयांनापासून उष्णतेपासून अंगाची होणारी काहिली थांबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबरोबर उन्हाच्या झळांपासून संरक्षणासाठी टोप्या, स्टोल, सनकोट, गॉगल्सला मागणी वाढत आहे. यामुळे या वस्तूंच्याही किंमतींमध्ये वाढ झाली असून विक्रेत्यांकडून कुठल्याहीप्रकारे किंमतीमध्ये तडजोड न करता भावावर ठाम राहून वस्तूंची विक्री करण्याचा प्रयत्न होत आहे. तसेच शहरातील विविध रस्त्यांवर उसाच्या रसाचे गु-हाळ, लिंबू सरबत, मसाला ताक, अननस, संत्री, मोसंबी ज्यूस विक्रीची दुकाने थाटली असून दुकानांवर गर्दी होऊ लागल्याचे चित्र आहे.