शहराचे वैभव वाढावे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 12:54 PM2019-12-15T12:54:50+5:302019-12-15T12:55:09+5:30
शहराला एकच कौटुंबिक न्यायालय असल्याने त्याचेवर प्रचंड ताण येतोय. पुण्यासारख्या ठिकाणी पाच कौटुंबिक न्यायालये आहेत. नाशिक येथे अजून एक कौटुंबिक न्यायालय आवश्यक आहे.
दीपक बर्वे
शहराला एकच कौटुंबिक न्यायालय असल्याने त्याचेवर प्रचंड ताण येतोय. पुण्यासारख्या ठिकाणी पाच कौटुंबिक न्यायालये आहेत. नाशिक येथे अजून एक कौटुंबिक न्यायालय आवश्यक आहे. नाशिकरोड येथील नवीन इमारतीत जिल्हा व सत्र न्यायाधीश दिल्यास सिन्नर आणि इगतपुरी येथील सर्व केसेस नाशिकरोड न्यायालयात वर्ग केल्यास नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचेल. याकरिता बार असोसिएशनचे प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधी यांनी जाणीवपूर्वक लक्ष घालून नाशिकरोडच्या वैभवात भर घालण्याचे काम केले पाहिजे. नाशिकरोडच्या वैभवात भर घालणारी नवीन न्यायालयाची इमारत उद्घाटनच्या प्रतीक्षेत आहे. गेल्या अनेक दशकांपासून नाशिकरोडचा प्रगतीचा आलेख उंचावत गेला. त्याला प्रमुख कारण म्हणजे येथील करन्सी नोट प्रेस, इंडिया सिक्युरिटी प्रेस, कर्षण मशीन कारखाना, गांधीनगर प्रेस इत्यादीमध्ये लागलेले स्थानिक लोक नाशिकरोडची ‘अर्थव्यवस्था’ केवळ प्रेसवर अवलंबून होती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. काळाच्या ओघात आणि एकंदरित जागतिकीकरणाच्या प्रभावामुळे सगळ्याच बाबीमध्ये बदल घडवून आला. पूर्वी नाशिकरोडमध्ये बिटको, रेजिमेंटल व अनुराधा अशा थिएटर इत्यादी तर कॅम्पमध्ये अॅडल्फी, कॅथे असे थिएटर होते. आता ही सर्व थिएटर काळाच्या ओघात बंद झालेली आहेत. त्याऐवजी मॉल उभे राहिले आहेत. त्यामध्ये एक किंवा दोन स्क्रिनचे थिएटर आहेत. पूर्वी रस्ते एकदमच अरुंद होते; परंतु आता ६० फुटी व दुतर्फा झालेले आहेत. शिवाय रहदारीही वाढली आहेत. प्रत्येक घरात एक चारचाकी, दोन दुचाकी असे प्रमाण आहे. त्यामुळे रहदारीचा पार्किंगचा प्रचंड प्रश्न भेडसावू लागला आहे. वित्तीय संस्था कर्जे देऊ लागल्याने मध्यमवर्गीय लोक आरामात चारचाकी घेऊ लागले आहेत.
नाशिक ते द्वारका प्रचंड वाहतूक व्यवस्था झालेली आहे. पूर्वी नाशिकला जायला २० मिनिटे लागत. आता सिग्नलमुळे व वाहतूक कोंडीमुळे शहरात जायला ४० मिनिटे लागतात. वाहतूक पोलिसांवर - प्रशासनावर प्रचंड ताण आलेला आहे. त्यामुळे द्वारका ते दत्तमंदिर उड्डाणपूल होणे गरजेचे आहे. नाशिकरोडमध्ये फ्लाइंग झोनमुळे बहुमजली बिल्डिंग बांधता येत नाही. ज्या बिल्डिंग २०/३० वर्षांपूर्वी बांधलेल्या आहेत त्यांना पार्किंग नाही. त्यामुळे अनेक लोकांना त्यांची वाहने रस्त्यावरच पार्क कराव्या लागतात. अशा बिल्डिंग आता पाडणे गरजेचे आहे. आज नाशिक, भगूर, शिंदे-पळसे, पिंपळगाव खांब, नांदूरनाका, सामनगाव अशा पद्धतीने सर्वांगीण विकास आणि सिमेंटची जंगले होत आहेत. परंतु त्यामध्ये सुविधा देत नाहीत. रस्त्यावर नेहमी खड्डे होतात. त्याकडे लक्ष नाही. मध्ये नाशिकरोड मनपा विभागीय कार्यालयासमोर खड्डा पडलेला होता त्याचे काम ३ ते ४ महिने चाललेले होते. सामान्य माणसाला एवढाच प्रश्न येतो की, ‘आम्ही मनपाचे कर यासाठीच भरतो काय? नाशिकरोडची लोकसंख्या झपाट्याने वाढलेली पूर्वी खेडेगाव म्हणून ओळख राहिलेली गावे आता शहरामध्ये समाविष्ट झालेली आहेत. त्यामुळे त्यांचाही विकास होणे गरजेचे आहे. नाशिक मनपा मराठी शाळेची अत्यंत दुरवस्था/दयनीय अवस्था झालेली आहे. त्यामुळे आपली मराठी (गरीब) विद्यार्थी कसे अधिकाधिक शिकतील याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे.
नाशिकरोडमध्ये स्पर्धा परीक्षांची विद्यार्थ्यांना गोडी लावणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी संभाजी मोरुस्कर यांनी उभी केलेली ‘अटल अभ्यासिका’ अत्यंत प्रशंसनीय व अभिनंदनीय बाब आहे.
सध्या कार्पोरेटचा जमाना आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनीसुद्धा अधिकाधिक आधुनिक माहिती घेऊन नाशिकरोडच्या वैभवात कशी भर पडेल याचा अभ्यास करून कृतिशील कार्यक्रम प्रत्यक्षात अमलात आणला पाहिजे. शहर सुंदर स्वच्छ भयमुक्त, सर्वसामान्य नागरिकांना आनंद वाटेल, असं व्हायला हवं.
नाशिकरोडच्या वैभवात नाशिक-कसारा लोकल केव्हा चालू होणार यासंबंधीसुद्धा संदिग्धता आहे. त्यामुळे बऱ्याच प्रमाणावर दळणवळणाचा फायदा होणार असून, व्यापारी, नोकरदार, स्थानिक शेतकरी, मजूर यांना याचा फायदा होणार असून, त्याचा फायदा नाशिकरोडच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. आजूबाजूची खेडी विकसित होतील. रोजगार मिळेल नव्या व्यापारीसंधी निर्माण होतील. हॉटेल व्यवसाय तसेच नाशिकच्या पर्यटनासाठी त्याचा बराच फायदा होणार आहे.