अन्य गुन्ह्यांचाही लवकर उलगडा होवो ! डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी छगन भुजबळ यांचे विधान
By धनंजय रिसोडकर | Published: May 10, 2024 04:31 PM2024-05-10T16:31:19+5:302024-05-10T16:31:56+5:30
दाभोलकर यांच्यासह अन्य तीन हत्या लिंक्ड असण्याची पूर्वीपासून शक्यता, असं देखील ते म्हणाले.
धनंजय रिसोडकर, नाशिक : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी दोघांना आजन्म जन्मठेप आणि तिघांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली आहे. तब्बल ११ वर्षांनी हा निकाल लागलेला आहे. दाभोलकर यांच्यासह पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश या तिन्ही हत्या लिंक्ड असण्याची शक्यता फार पूर्वीपासून माध्यमांतून व्यक्त होत आहे. त्यामुळे त्या गुन्ह्यांतील गुन्हेगारांचाही लवकर उलगडा होऊन न्यायदेवतेकडून त्यांना शिक्षा व्हावी, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असल्याचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सांगितले.
दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने शिक्षा जाहीर केल्यानंतर भुजबळ हे पत्रकारांशी बोलत होते. दाभोलकर प्रकरणातील आरोपीच प्रदीर्घ काळ सापडत नव्हते. त्यानंतर काही सापडल्यावर मग त्यातील दोघांना जन्मठेप झाली असली तरी तिघे पुराव्याअभावी निर्दोष सुटलेले आहेत. दाभोलकर यांच्याप्रमाणेच पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश हे अंधश्रद्धा आणि समाजातील अयोग्य बाबींवर बोलणारी समाजसुधारक मंडळी होती. अंधश्रद्धेविरोधात पावले उचलावीत, कायदे करावेत अशा मागण्यादेखील त्यांनी वारंवार केल्या होत्या.
त्यानंतर राज्य शासनाने तशा स्वरूपाचा कायदादेखील केला. तो कितपत प्रभावी आहे किंवा नाही हा मुद्दा वेगळा असला तरी तो कायदा त्यांच्यासारख्या समाजसेवकांच्या जनरेट्याने झाला. त्या चौघांच्या हत्या या एकमेकांशी लिंक्ड असल्याचे त्यावेळी वर्तमानपत्रांमधून येत होते. मात्र, त्याबाबत लवकर गुन्हेगारांची उकल होऊन त्यांना शिक्षा व्हावी, हीच जनसामान्यांची इच्छा असल्याचेही भुजबळ यांनी नमूद केले.