महापौरांचे सीईओ थवील यांना पुन्हा अभय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 01:03 AM2019-09-14T01:03:24+5:302019-09-14T01:03:42+5:30
स्मार्ट सिटीच्या कारभारावर टीका करतानाच नगरसेवकांनी लक्ष केलेले कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांना महापौर रंजना भानसी यांच्यासह सत्तारूढ भाजपाने पूर्णत: संरक्षण दिले आहे.
नाशिक : स्मार्ट सिटीच्या कारभारावर टीका करतानाच नगरसेवकांनी लक्ष केलेले कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांना महापौर रंजना भानसी यांच्यासह सत्तारूढ भाजपाने पूर्णत: संरक्षण दिले आहे.
गेल्या सोमवारी (दि.९) झालेल्या महासभेत महापौरांनी स्वत:च थवील यांच्या वादग्रस्त कारभारामुळे बदली करण्याचे आदेश दिले होते. परंतु मखमलाबाद येथील ग्रीन फिल्डच्या ठरावात मात्र त्यासंदर्भातील सर्व उल्लेखच वगळण्यात आला असून, त्यामुळे महापौरांनी पाठराखण केल्याचे स्पष्ट झाले आहे. स्मार्ट सिटीच्या परस्पर चालणारा कारभार आणि नगरसेवकांना अंधारात ठेवून राबविलेले जाणारे प्रकल्प नागरिकांना होणारा त्रास यामुळे नगरसेवकांनी स्मार्ट सिटीच्या कारभारावर विशेष महासभा बोलविण्याची मागणी केली होती. महापौरांनी ती मान्य केली होती. मात्र, अशी कोणतीही विशेष महासभा बोलवली नव्हती. दरम्यान, सोमवारी (दि.९) स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने मखमलाबाद शिवारात ग्रीन फिल्ड प्रकल्प राबविण्यासाठी महासभेवर प्रस्ताव होता. ही संधी साधून अनेक नगरसेवकांनी स्मार्ट सिटीच्या कारभारावर टीका केली.
यावेळी थवील यांना महापालिकेकडून किती हिस्सा मिळाला त्याची आणि ज्या एका किलोमीटर रस्त्यासाठी कंपनीने २१ कोटी मोजले त्याची विकास आराखड्यातील नियोजित रुंदी किती होती हेदेखील सांगता आले नाही. साकारणार आहे विशेष म्हणजे कंपनीवर आणि व्यक्तिगत थवील यांच्यावर टीका होत असताना ते हसत होते. त्यामुळे नगरसेवक तर अधिकच संतप्त झाले. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी टीका करताना असाच प्रकार झाल्याने शिवसेनेचे नगरसेवक संतप्त झाले आणि त्यांनी थवील यांच्या बदलीची मागणी केली. त्यावर सभागृहनेता सतीश सोनवणे यांनी ती मान्य केलीच, परंतु स्थायी समितीचे सभापती उद्धव निमसे यांनीदेखील ग्रीन फिल्ड प्रकल्प चांगला असला तरी चुकीच्या अधिकाऱ्याच्या हातून तो होणार नसल्याने ठरावातच तसा उल्लेख करू, असे सांगितले.
शिवसेनेच्या आणि विरोधकांच्या आक्रमक भूमिकेनंतर महापौर रंजना भानसी यांनी मखमलाबाद येथे टीपी स्कीमसाठी इरादा जाहीर करण्याचा निर्णय देताना प्रकाश थवील यांच्यावर आयुक्तांनी कारवाई करावी तसेच त्यांची बदली करावी, असे आदेश दिले होते. मात्र, बुधवारी (दि.११) घाईघाईने हा ठराव करताना त्यात थवील यांची बदली करावी, असा कोणताही उल्लेख न करता त्यांना अभय दिले आहे. त्यामुळे महापौरांच्या भूमिकेविषयी उलट सुलट चर्चा होत आहे.