लेट लतिफांना महापौरांचा दणका

By admin | Published: July 7, 2017 06:08 PM2017-07-07T18:08:41+5:302017-07-07T18:08:41+5:30

पंचवटी विभागीय कार्यालयात कामकाजाची वेळ सुरू होऊनही वेळेत हजर नसलेल्या अधिकारी, लिपिक तसेच अन्य कर्मचाऱ्यांना महापौर रंजना भानसी यांनी फैलावर घेतले.

Mayor of Late Latif | लेट लतिफांना महापौरांचा दणका

लेट लतिफांना महापौरांचा दणका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पंचवटी : पंचवटी विभागीय कार्यालयात कामकाजाची वेळ सुरू होऊनही वेळेत हजर नसलेल्या अधिकारी, लिपिक तसेच अन्य कर्मचाऱ्यांना महापौर रंजना भानसी यांनी फैलावर घेतले. विभागीय कार्यालयातील या सावळ्या गोंधळाचा खरपूस समाचार घेतानाच सुमारे २७ लेट लतिफांना नोटिसा बजावण्याची कारवाई करण्याचे आदेश भानसी यांनी उपायुक्तांना दिले आहे. कार्यालयातील ज्या त्या विभागातील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांवर अंकुश ठेवावा अशा सूचनाही महापौरांनी दिल्या.
गुरुवारी (दि. ६) लोकमत चमूने पंचवटी विभागीय कार्यालयातील एकूणच कारभारावर प्रकाश टाकणारे वृत्त प्रसिद्ध केले. त्यात कार्यालयातील विविध विभागांतील कर्मचारी, अधिकारी हजर नसल्याचे तसेच कार्यालयात शुकशुकाट असल्याचे निदर्शनास आले होते. ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत महापौर रंजना भानसी तसेच मनपा उपायुक्त हरिभाऊ फडोळ यांच्यासह नगरसेवक अरुण पवार, जगदीश पाटील यांनी सकाळी १० वाजून २० मिनिटांनी थेट विभागीय कार्यालय गाठले आणि तेथील हजेरी मस्टरची तपासणी केली. त्यावेळी धक्कादायक बाब उघडकीस आली. कार्यालयातील कर्मचाऱ्यांपैकी २७ कर्मचारी वेळेत हजर नसल्याचे बघून महापौरांचा पारा चढला व त्यांनी विभागीय अधिकाऱ्यांसह सर्वांचीच कानउघडणी केली.
विभागीय अधिकाऱ्यांच्या दालनात महापौरांनी, उपायुक्त तसेच विभागीय अधिकारी राजेंद्र गोसावी यांच्याशी चर्चा करून कर्मचाऱ्यांवर अंकुश ठेवण्याच्या सूचना देत शुक्रवारी लेट लतिफ कर्मचाऱ्यांना तत्काळ नोटिसा बजावून त्यांचा एकदिवसाचा पगार कापण्याची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. महापौरांनी केलेल्या अचानक भेटीमुळे लेट लतिफांची चांगलीच धावपळ उडाली होती.

Web Title: Mayor of Late Latif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.