महापौर चषक : जिम्नॅस्टिक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा रंगला शोभायात्रेत क्रीडाप्रकार, कसरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 01:30 AM2018-02-11T01:30:47+5:302018-02-11T01:31:29+5:30
नाशिक : खेळांविषयी जागृती निर्माण होऊन खेळाडू घडावे यासाठी शनिवारी (दि.१०) शहरातून शोभायात्रा काढण्यात आली.
नाशिक : क्रिकेट, हॉकी, टेनीस फुटबॉल, कुस्ती, कबड्डी, खो-खोसारख्या स्पर्धांप्रमाणेच जिम्नॅस्टिक क्रीडा प्रकारांतील सर्व खेळांविषयी जागृती निर्माण होऊन नाशिकमधून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडावे यासाठी छत्रपती शिवाजी स्टेडियमवर आयोजित जिम्नॅस्टिक स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि.१०) शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. महानगरपालिका व नाशिक जिल्हा जिम्नॅस्टिक असोसिएशनतर्फे ‘नाशिक महापौर जिम्नॅस्टिक चषक राज्य अजिंक्यपद’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, शनिवारी छत्रपती शिवाजी स्टेडियमपासून शोभायात्रा काढून विविध जिम्नॅस्टिक क्रीडा प्रकारांविषयी जनजागृती व प्रचार, प्रसार करण्यात आला. याप्रसंगी महापौर रंजना भानसी, नाशिक जिल्हा जिम्नॅस्टिक असोसिएशनचे अध्यक्ष शाहू खैरे, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, उपाध्यक्ष भालचंद्र भट, सचिव राकेश केदारे, सहसचिव कुमार शिरवाडकर, श्रीराज काळे, किरण कविश्वर, क्र ीडा अधिकारी एम. डी. पगारे, नगरसचिव राजू कुटे आदी उपस्थित होते. या शोभायात्रेत सहभागी झालेल्या खेळाडंूनी क्रीडारथांवर स्वार होत वेगवेगळे जिम्नॅस्टिक क्रीडा प्रकारांचे सादरीकरण करीत नाशिककरांची मने जिंकून घेतली. राज्यभरातून आलेल्या जिम्नॅस्टिकच्या संघानीही या शोभायात्रेत सहभाग नोंदवला. ढोलपथकांच्या गजरात लेझीम पथकांसह जिम्नॅस्टिकचे खेळाडू महानगरपालिकेच्या व अन्य खासगी संस्थांच्या शाळांच्या सुमारे एक हजार विद्यार्थ्यांनी रोप, मल्लखांब, कराटे, योगासने आदी विविध क्रीडाप्रकारांचे शोभायात्रेत सादरीकरण केले. या शोभायात्रेचा अशोकस्तंभ, रविवार कारंजा, मेनरोड, शालिमारमार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी स्टेडियमवर आल्यानंतर शोभायात्रेचा समारोप झाला.