प्रभागातील आरोग्य जागृती फेरीविषयी महापौरच अनभिज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 12:41 AM2018-10-09T00:41:25+5:302018-10-09T00:41:42+5:30
नाशिक : शहरातील रोगराईसंदर्भात दक्षता, जनजागृती करण्यासाठी महापौर रंजना भानसी यांच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये फेरी काढण्यात आली खरी; परंतु त्यासंदर्भात महापौरांना ऐनवेळी सांगण्यात आले तर अन्य नगरसेवक पूर्णत: अंधारात होते. सोमवारी (दि.८) सकाळी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासह अन्य अधिकारी धडकल्यानंतरच त्यांना फेरीचा उलगडा झाल्याने नगरसेवकांनी संताप व्यक्त केला आहे.
शहरात रोगराई वाढत असून, स्वाइन फ्लू व डेंग्यू आजारांचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीने सोमवार (दि. ८) पासून शहरात पाच प्रभागात ही मोहीम राबविण्यास प्रारंभ झाला आहे. पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक एकमध्ये सकाळी ही मोहीम राबविली जाणार असताना महापौर रंजना भानसी, अरुण पवार यांच्यासह या प्रभागाच्या अन्य कोणत्याच नगरसेवकांना कल्पना देण्यात आली नव्हती. गावात महापौरांनी नेहमीच्या ठिकाणी थांबून नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अचानक त्यांना अशाप्रकारची मोहीम राबवली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ही मोहीम सुरू झाली. यावेळी महापौर भानसी, आयुक्त तुकाराम मुंढे, स्थायी समितीच्या सभापती हिमगौरी आहेर, पंचवटी प्रभागाच्या सभापती पूनम धनगर यांच्या हस्ते मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. पूर्व विभागात प्रभाग क्रमांक २३ मध्ये सभापती सुमन भालेराव, मिर्झा शाहिन सलिम बेग व यशंवत निकुळे यांच्या हस्ते मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच सिडको विभागात प्रभाग क्रमांक २५ मध्ये सभापती हर्षा बडगुजर यांच्या हस्ते नाशिकरोड विभागात प्रभाग क्रमांक १७ मध्ये प्रशांत दिवे, दिनकर आढाव, मंगल आढाव यांच्या हस्ते व सातपूर विभागात प्रभाग अकरामध्ये दीक्षा लोंढे व सीमाताई निगळ, नगरसेविका यांच्या हस्ते मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.
विविध उपक्रम राबविण्यात येणार
सदर मोहिमेत विद्यार्थांना प्रतिज्ञा मार्गदर्शन, प्रभात फेरी, घरोघरी भेट देऊन डास उत्पत्तीस्थाने शोधणे, स्वाइन फ्लू, रु ग्ण परिसरात सर्वेक्षण व स्वच्छता, तसेच नागरिकांना लाउड स्पिकरव्दारे सूचना पत्रके, स्टिकर्स, बॅनर्सव्दारे प्रबोधन आदी उपक्रम राबविण्यात आले. अशाप्रकारची मोहीम दररोज प्रत्येक प्रभागात राबविण्यात येणार आहे.