महापौरपद खुले झाल्याने वाढणार चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 12:38 AM2019-11-14T00:38:36+5:302019-11-14T00:39:24+5:30

मुंबई येथे बुधवारी (दि.१३) काढण्यात आलेल्या महापौरपदाच्या आरक्षणाच्या सोडतीत नाशिकचे महापौरपद हे खुले झाले आहे. त्यामुळे आता या पदासाठी प्रचंड चुरस वाढणार आहे.

 Mayor's openness will increase | महापौरपद खुले झाल्याने वाढणार चुरस

महापौरपद खुले झाल्याने वाढणार चुरस

googlenewsNext

नाशिक : मुंबई येथे बुधवारी (दि.१३) काढण्यात आलेल्या महापौरपदाच्या आरक्षणाच्या सोडतीत नाशिकचे महापौरपद हे खुले झाले आहे. त्यामुळे आता या पदासाठी प्रचंड चुरस वाढणार आहे. महापालिकेत भाजपचे पूर्ण बहुमत असले तरी राज्यातील सत्तांतर होऊन शिवआघाडीचे सरकार स्थापन झाल्यास मात्र महापालिकेत भाजपला कडवे आव्हान राहणार आहे.
राज्यातील २७ महापालिकांच्या महापौरपदासाठी बुधवारी (दि. १३) मुंबईत सोडत काढण्यात आली. त्यात नाशिकचे महापौरपद आता खुले झाले आहे. म्हणजेच त्यात खुल्या प्रवर्गाप्रमाणेच अन्य कोणत्याही राखीव प्रवर्गातील उमेदवारदेखील अर्ज दाखल करू शकतो. २०१७ मध्ये महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या. त्यावेळी नाशिकचे महापौरपद हे अनुसूचित जमातीसाठी आरक्षित होते. त्यानुसार रंजना भानसी यांची या पदावर निवड झाली. त्यांची मुदत १५ सप्टेंबर रोजी संपणार असतानादेखील विधानसभा निवडणुकीमुळे त्यांना १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली. विधानसभा निवडणुका होताच आता महापौरपदासाठी आरक्षणाची सोडत काढण्यात आली आहे.
महापालिकेत १२० पैकी ६५ नगरसेवक भाजपचे आहेत. त्यामुळे पूर्ण बहुमतामुळे या पक्षाला तसा थेट धोका नाही. मात्र, राज्यातील महाशिव आघाडीचा प्रयोग नाशिकमध्ये झाल्यास भाजपला मोठे आव्हान निर्माण होऊ शकते. महापालिकेत शिवसेनेचे ३४, राष्टÑवादी आणि कॉँग्रेसचे प्रत्येकी सहा म्हणजे एकूण बारा, मनसेचे पाच, अपक्ष तीन आणि एक रिपाइं आठवले गटाचा नगरसेवक आहे. याची बेरीज केली तर ती ५५ पर्यंत पोहोचते. बहुमतासाठी आणखी सहा नगरसेवक आवश्यक आहेत. मात्र सध्या भाजपातील अंतर्गत वाद तसेच माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे कथित समर्थक फुटल्यास सत्ता समीकरण बदलू शकते.
विधानसभा निवडणुकीत भाजपने उमेदवारी नाकारलेल्या बाळासाहेब सानप यांना अगोदरच शिवसेनेने आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे. त्यामागे महापौरपदावर असलेले शिवसेनेचे लक्ष लपून राहिलेले नाही. त्यातच राज्यात कॉँग्रेस, राष्टÑवादी, मनसे आणि शिवसेना एकत्र आल्याने नाशिकमध्येदेखील त्याचे परिणाम होऊ शकतात. त्यामुळेच नाशिकमध्ये सत्तेची समीकरणे बदलू शकतात. त्यादृष्टीने स्थानिक पातळीवर आता समीकरणे जुळवली जाणार आहेत.
महापालिकेत वाढली गर्दी
महापौरपदाच्या निवडणुकीसाठी सोडत जाहीर होताच महापालिकेच्या राजीव गांधी भवनात अचानक नगरसेवकांची गर्दी वाढली. विधानसभा निवडणूक आणि आचारसंहिता यामुळे महापालिकेत गेल्या तीन महिन्यांपासून शुकशुकाट होता. महापौरपदाच्या निवडणुकीसाठी बुधवारी (दि.१३) मुंबईत सोडत होणार होती त्यास महापालिकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले असले तरी केवळ स्थायी समिती सभापती उद्धव निमसे हेच गेले होते. महापौर रंजना भानसी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी मात्र नाशिकमध्येच राहणे पसंत केले.
महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाल्याने आता महापौरपदाची निवडणूक कधी जाहीर होते, याकडे लक्ष लागून आहे. सध्याच्या महापौरांचा कालावधी १५ डिसेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यातच निवडणूक होण्याची शक्यता आहे.
४या निवडणुकीसाठी मनपा नगरसचिव विभागाच्या वतीने विभागीय आयुक्तांना पत्र दिल्यानंतर ते निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करतात. महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी झाल्याने त्यात कोणत्याही प्रवर्गातील नगरसेवक त्यासाठी अर्ज करू शकतात.

Web Title:  Mayor's openness will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.