महापौरपदाची निवडणूक बिनविरोध?
By admin | Published: March 5, 2017 01:36 AM2017-03-05T01:36:15+5:302017-03-05T01:36:26+5:30
नाशिक : नाशिकमध्ये शिवसेनेकडून भाजपाविरुद्ध उमेदवार न देता महापौराची निवड बिनविरोध केली जाण्याची शक्यता वाढली आहे.
नाशिक : मुंबई महापालिकेत भाजपाने महापौरपदासह कोणत्याही समित्यांची निवडणूक न लढवता शिवसेनेला पाठिंबा देण्याचा आणि विरोधी पक्षात न बसण्याचा निर्णय जाहीर केल्याने नाशिकमध्ये शिवसेनेकडून भाजपाविरुद्ध उमेदवार न देता महापौराची निवड बिनविरोध केली जाण्याची शक्यता वाढली आहे. मुंबईबरोबरच नाशिकमध्येही सेना-भाजपा एकत्र येऊन पुढील पाच वर्षे एकत्रित संसार करणार काय, याबाबत सेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे.
मुंबईत भाजपाने शिवसेनेला मिळालेला कौल मान्य करत पूर्ण समर्थन देण्याचे जाहीर केले आहे. याशिवाय, कोणत्याही समित्यांची निवडणूक न लढविण्याचेही ठरविले आहे. मात्र, पारदर्शकतेच्या मुद्द्यावर कठोर भूमिका घेण्याचाही इशारा देऊन ठेवला आहे. मुंबईत सेना-भाजपा एकत्र राहणार असल्याने त्याचे पडसाद नाशिकमध्ये काय उमटतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. नाशिकमध्ये भाजपाला पूर्ण बहुमत आहे. भाजपाने ६६ तर शिवसेनेला ३५ जागा मिळाल्या आहेत. तर कॉँग्रेस-राष्ट्रवादी, मनसे, अपक्ष व रिपाइं मिळून संख्या २१ वर जाते. नाशकात भाजपाचाच महापौर-उपमहापौर होणार हे निश्चित आहे, परंतु महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत आता शिवसेना स्वतंत्र उमेदवार उभा करणार की बिनविरोध निवडीसाठी हातभार लावणार, याबाबत सेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागून असणार आहे.
येत्या १४ मार्च रोजी महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक घेण्यात येणार आहे. यंदा अनुसूचित जमातीसाठी महापौरपद आरक्षित असल्याने भाजपाकडून ज्येष्ठ नगरसेवक रंजना भानसी यांचे नाव सर्वात अग्रभागी आहे. भाजपाचे पूर्ण बहुमत असल्याने आता विरोधासाठी विरोध न करता उमेदवारच न देण्याचा निर्णय सेनेकडून होण्याची शक्यता आहे. मात्र, राष्ट्रवादी-कॉँग्रेस व मनसे यांच्याही भूमिकेवर बिनविरोध निवड अवलंबून असणार आहे. (प्रतिनिधी)