महापौरांची प्रतिष्ठा पणाला
By Admin | Published: February 16, 2017 01:30 AM2017-02-16T01:30:46+5:302017-02-16T01:31:03+5:30
लक्षवेधी ठरणार लढत : सेना, भाजपासमोर मनसेचे आव्हान
संदीप झिरवाळ पंचवटी
मनसे, भाजपा व शिवसेना या प्रमुख पक्षांचे उमेदवार प्रभाग ६ मधून नशीब अजमावत असून, यंदा महापौरपद अनुसूचित जमातीसाठी असल्याने या गटातून निवडून आलेला कोण्या एका पक्षाचा उमेदवारही उद्याच्या महापौरपदाचा दावेदार ठरू शकतो, त्यामुळे ही लढत शहरातील सर्वात लक्षवेधी ठरणार आहे.
प्रभागात गेल्या निवडणुकीत मनसे, शिवसेना, अपक्ष व भाजपाचे प्राबल्य होते. पूर्वीचा प्रभाग क्रमांक ६ व ७ मिळून नवीन प्रभाग ६ ची रचना करण्यात आलेली आहे. विद्यमान महापौर अशोक मुर्तडक याच प्रभागातून निवडणूक रिंगणात असल्याने भाजप, शिवसेनेसमोर त्यांना लढत देण्याचे आव्हान ठरणार आहे.
या प्रभागात चार विद्यमान तर दोन माजी व एक नगरसेवक पत्नी असे प्रमुख उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून अ गटाच्या अनुसूचित जमाती जागेसाठी माजी नगरसेवक पुंडलिक खोडे भाजपाकडून रिंगणात आहेत. खोडे पूर्वी दोनदा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले होते. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे माजी नगरसेवक डॉ. जगन्नाथ तांदळे यांनी मनसेत प्रवेश केल्याने त्यांची पत्नी चित्रा तांदळे मनसेकडून रिंगणात आहेत. भाजपाचे विद्यमान नगरसेवक प्रा. परशराम वाघेरे यांना भाजपाने उमेदवारी डावलल्याने त्यांनी बंडखोरी करून शिवबंधन हाताशी बांधल्याने ते शिवसेनेकडून निवडणूक रिंगणात आहेत.
ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटातून शिवसेनेच्या विद्यमान नगरसेवक मनीषा हेकरे सेनेकडून रिंगणात उतरल्या आहेत. गेल्यावेळी त्या शिवसेनेच्या एकमेव उमेदवार म्हणून पंचवटीतून निवडून आल्या होत्या. राष्ट्रवादी कॉँग्रेसने सुरेश आव्हाड यांच्या पत्नी कविता आव्हाड यांना उमेदवारी दिली आहे. भाजपाकडून सुनीता पिंगळे, मनसेकडून शीतल थोरात या निवडणूक लढवित आहेत. ब गटात कॉँग्रेस वगळता शिवसेना, मनसे, भाजपा व राष्ट्रवादी या चारही प्रमुख पक्षांनी उमेदवार रिंगणात उतरविले आहेत.
क सर्वसाधारण महिला गटात भाजप नेते सुनील बागुल यांच्या मातोश्री माजी नगरसेवक भिकुबाई बागुल या भाजपाकडून निवडणूक लढवित आहेत. मनसेने छाया काकड तर शिवसेनेने लंकाबाई शिंदे यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. बागुल यांनी यापूर्वी प्रभागाचे नेतृत्व केल्याने मनसे, शिवसेनेच्या उमेदवारांची लढाई भाजपाबरोबर होण्याची शक्यता आहे.
ड सर्वसाधारण गटात विद्यमान महापौर अशोक मुर्तडक हे पुन्हा रिंगणात आहेत. मुर्तडक हे तीन वेळा शिवसेना तर गेल्यावेळी मनसे असे चार वेळा निवडून आलेले आहेत. गेल्या निवडणुकीत अपक्ष व नंतर भाजपात दाखल झालेले विद्यमान नगरसेवक दामोदर मानकर हे भाजपाकडून निवडणूक लढवित आहेत. ते पूर्वी स्वीकृत नगरसेवकही होते. शिवसेनेने दीपक पिंगळे यांना उमेदवारी दिलेली आहे. ड गटातील प्रमुख लढत मुर्तडक, मानकर व पिंगळे यांच्यात होणार असून ब व ड गटात एकाच जातीचे उमेदवार व एकाच भागातील रहिवासी असलेले काही उमेदवार समोरासमोर येत असल्याने मतांची काहीशी विभागणी होण्याची शक्यता आहे. ड गटात मनसेच्या बंडखोरासह अन्य दोन अपक्ष रिंगणात आहेत.