आजपासून एमबीबीएसच्या परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 01:35 AM2021-03-08T01:35:53+5:302021-03-08T01:38:30+5:30
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापठाच्या हिवाळी २०२० सत्राच्या अंतिम वर्षाच्या सर्व आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा सोमवार (दि.८) पासून सुरू होणार आहे.
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापठाच्या हिवाळी २०२० सत्राच्या अंतिम वर्षाच्या सर्व आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा सोमवार (दि.८) पासून सुरू होणार आहे.
या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचे नियोजन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने केले असून राज्यभरातील १६५ परीक्षा केंद्रावर कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर सॅनिटायझर व सोडीयम हायपोक्लोराईड उपलब्ध करून देण्यासाठी २० हजार रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी दिली आहे.
त्यानंतर पदवी अंतिम वर्षाच्या प्रात्यक्षिक परीक्षा मार्चच्या अखेरीस होणार आहे. तर पदवीपूर्व म्हणजे प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या प्रात्यक्षिक परीक्षा एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात होणार असल्याचे डॉ. अजित पाठक यांनी सांगितले. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यापूर्वी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षाही ऑफलाइन पद्धतीनेच घेण्यात आल्या होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना आरोग्य विद्यापीठातर्फे विशेष कोरोना सुरक्षा कवच विमा देऊन परीक्षा घेण्यात आल्या होत्या. यावेळीही कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, परीक्षेकरिता आवश्यक परीक्षा प्रवेशपत्र ऑनलाइन प्रणालीद्वारे संबंधित महाविद्यालये व विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले आहेत.
पदवीपूर्व परीक्षा २३ मार्चपासून ऑफलाइन पद्धतीने
वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, समचिकित्सा, परिचर्या, भौतिकोपचार, व्यावसायोपचार, भाषा श्रवणदोष विज्ञान आदी विषयांच्या अंतिम पदवी अभ्यासक्रम परीक्षा ८ ते २६ मार्च या कालावधीत होणार असून या परीक्षेला राज्यभरातील १६५ केंद्रांवर तब्बल १० हजार ९९५ विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहे. तर विद्यापीठाच्या वैद्यकीय, दंतरोग, होमिओपॅथी, आयुर्वेद, युनानी आदी विविध विद्या शाखांच्या पदवीपूर्व म्हणजे प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षा २३ मार्चपासून ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत.