महागाईचा तडका! गॅस सिलिंडर दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे जेवण झाले महाग
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 04:36 PM2022-04-20T16:36:55+5:302022-04-20T16:39:38+5:30
सायखेडा : भाज्या, खाद्यतेल, डाळी आणि व्यावसायिक वापरासाठी असलेल्या गॅस सिलिंडरच्या दरांमध्येही गेल्या काही दिवसांपासून वाढ झाल्याने मुंबई पुणे ...
सायखेडा : भाज्या, खाद्यतेल, डाळी आणि व्यावसायिक वापरासाठी असलेल्या गॅस सिलिंडरच्या दरांमध्येही गेल्या काही दिवसांपासून वाढ झाल्याने मुंबई पुणे नाशिकसह जिल्ह्य़ातील जवळपास सर्वच शहरांमधील खानावळी तसेच पोळीभाजी केंद्रांमध्ये विक्री होणाऱ्या पदार्थाच्या दरात वाढ झाली आहे.
या केंद्रात शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाच्या थाळीमागे प्रत्येकी १० ते १५ रुपयांची वाढ झाली असून याचा फटका सर्वसामान्यांना बसू लागला आहे. इंधन दरवाढ झाल्याने गेल्या काही महिन्यांपासून डाळी, तेल, भाज्यांचे दर वधारले आहेत. मागील महिन्यापासून घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठी असलेल्या गॅस सिलिंडरच्या दरातही वाढ झालेली आहे. घरगुती उपयोगात येणाऱ्या १४ किलो वजनी गॅस सिलिंडरच्या किमतीत ४० रुपयांची वाढ झाली आहे. त्याचे दर आता ८२० रुपये झाले आहे. व्यावसायिक वापरासाठी असलेल्या १९ किलो वजनी सिलिंडरची किंमत १ हजार ५६३ झाली आहे.
गेल्या महिन्याभरात व्यावसायिक वापरासाठी असलेले सिलिंडर १०० रुपयांनी महागले आहे. यामुळे खानावळी आणि पोळीभाजी केंद्र चालविणाऱ्यांची व्यावसायिक गणितही बिघडू लागले आहे. पोळीभाजी केंद्र आणि खानावळीमध्ये मिळणाऱ्या जेवणाच्या थाळींचे दर १० ते १५ रुपयांनी महागले आहेत. आम्ही जेवणाच्या दरात वाढ केली तर ग्राहक दुसरा पर्याय शोधतील आणि आमच्यासारख्या छोट्या खानावळी चालविणाऱ्यांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागेल, असे काही घरगुती खानावळ चालवणाऱ्या महिलांचे म्हणणे आहे. कोरोनामुळे नोकरदार वर्गाने बाहेरच्या जेवणाकडे पाठ फिरवली आहे.