डेंग्यू नियंत्रणासाठी उपाययोजनामहापालिका : दमट हवामानामुळे डेंग्यूचा प्रभाव वाढण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 12:31 AM2017-12-08T00:31:18+5:302017-12-08T00:33:33+5:30
नाशिक : नाशिककरांना भंडावून सोडणाºया डेंग्यू आजाराचा जोर ओसरत असतानाच मंगळवारी (दि.५) ओखी वादळाच्या प्रभावामुळे पाऊस पडल्याने डेंग्यू पुन्हा डोके वर काढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागाने डेंग्यू नियंत्रणासाठी फवारणीसह डासांच्या अळ्या नष्ट करण्याची मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे.
नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात डेंग्यूच्या आजाराने पछाडलेल्या रुग्णांची संख्या घटली होती. डेंग्यूचा प्रभाव काहीसा कमी होत चालला असतानाच दक्षिण किनारपट्टीवर धडकलेल्या ओखी वादळाच्या प्रभावाचा परिणाम म्हणून शहरात दिवसभर पावसाने हजेरी लावली. पावसामुळे पुन्हा ठिकठिकाणी छतांवर तसेच रस्त्यांवर पाणी साचले. त्यामुळे डेंग्यूच्या डासांच्या अळ्यांची उत्पत्ती होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यासाठी मनपा नागरिकांना साचलेले पाणी नष्ट करण्याचे आवाहन केले असून, आवश्यक त्या ठिकाणी तपासणी करतानाच फवारणीही सुरू केली आहे.