मुथूट दरोडा प्रकरणातील अकरा संशयितांवर मोक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 12:54 AM2019-07-27T00:54:52+5:302019-07-27T00:55:47+5:30
उंटवाडीतील मुथूट फायनान्सवर १४ जून २०१९ सोने लूट करण्याच्या उद्देशाने दरोडा टाकणाऱ्या सहा मुख्य आरोपी व दरोड्याच्या कटात सहभागी असलेल्या पाच संशयितांसह अकरा संशयितांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास पाटील यांनी शुक्रवारी (दि.२६) आयुक्तालयातील पत्रकार परिषदेत दिली.
नाशिक : उंटवाडीतील मुथूट फायनान्सवर १४ जून २०१९ सोने लूट करण्याच्या उद्देशाने दरोडा टाकणाऱ्या सहा मुख्य आरोपी व दरोड्याच्या कटात सहभागी असलेल्या पाच संशयितांसह अकरा संशयितांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास पाटील यांनी शुक्रवारी (दि.२६) आयुक्तालयातील पत्रकार परिषदेत दिली. या दरोड्यातील प्रमुख सूत्रधार बिहारचा कुख्यात गुन्हेगार सुबोधसिंग याने बिहारमध्ये कारागृहातून या गुन्हाचा कट रचल्याची माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली असून, त्याचा प्रत्यार्पणासाठी नाशिक पोलिसांचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
उंटवाडीतील मुथूट फायनान्सवरील दरोड्यातील लूट केलेला ऐवज वाहून नेण्यासाठी त्यांनी आयशर ट्रक (जीजे ०५, बीयू ८६५१) पेठरोडवर शहराच्या वेशीजवळ उभा केलेला होता. याच आयशरमधून चोरट्यांनी आशेवाडी येथे दुचाकी सोडून सुरतकडे पलायन केले होते. पोलिसांनी संबंधित वाहनाचा माग काढून ते ताब्यात घेत केलेल्या तपासात बिहारमधील कुख्यात गुन्हेगार सुबोधसिंह याने तेथील एका कारागृहातून या दरोड्याचा कट रचल्याचे समोर आले आहे. सुबोधसिंग यानेच दरोड्यातील आरोपितांना वाहनखरेदी पैसे दिले होते. पोलिसांनी यापूर्वी जितेंद्रसिंग विनयबहाद्दूरसिंग राजपूत व शार्पशूटर परमेंदर सिंग या दोघांना बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्ह्यातील वाहनही पोलिसांच्या हाती लागले आहे. त्याआधारे पोलिसांनी तपासाची चक्र फिरवून अभियंता साजू सॅम्युअलवर गोळ्या झाडणारा आकाशसिंग विजयबहाद्दूर सिंह राजपूत (३०) यालाही अटक केली आहे. तसेच या प्रकरणाचा प्रमुख सूत्रधार सुबोधसिंह याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सुरू असून, अन्य फरार संशयितांचाही पोलीस शोध घेत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी पोलीस उपायुक्त लक्ष्मण पाटील, अमोल तांबे, पौर्णिमा चौघुले, सहायक पोलीसआयुक्त आर. आर. पाटील यांच्यासह आकाशसिंगला बिहारमधून जेरबंध करणारे पोलिसांचे पथक उपस्थित होते.
१६ कोटींचे सोने लुटण्यासाठी दरोडा
उंटवाडीतील मुथूट फायनान्सच्या कार्यालयात सुमारे १६ कोटी रुपयांचे सोने असल्याची माहिती या गुन्ह्यातील आरोपींना मिळाली होती. हे सोने लुटण्यासाठीच त्यांनी दरोड्याचा कट रचून लुटलेल्या सोन्याची वाहतूक करण्यासाठीच आयशर वाहनाची तरतूद करण्यात आली होती. त्यासाठी सुबोधसिंग याने दोन टप्प्यात जितेंद्रसिंग परमेंदरसिंग यांना पैसे दिल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
सुबोधसिंहवर देशभरात १३ गुन्हे
मुथूट दरोडा प्रकरणाच्या तपासात या प्रकरणाचा कट बिहारमधील एका कारागृहातून कुख्यात गुन्हेगार सुबोधसिंह यांने रचल्याचे समोर आले आहे. त्याचावर देशभरात अशा प्रकारे बँका, फायनान्स कंपन्यांसह मोठ्या आस्थापनांच्या कार्यालयांवर सशस्त्र दरोडे टाकण्याचे १३ गुन्हे दाखल आहे.
अॅपद्वारे संवाद
मुथूट दरोड्याचील आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांनी त्यांचे मोबाइल ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला. परंतु, या प्रकरणातील आरोपी एकमेकांशी मोबाइलवरील इंटरनेटच्या माध्यमातून वाइस अॅपद्वारे संवाद साधत असल्याने पोलिसांना आरोपींपर्यंत पोहचण्याचे अडचण येत असतानाही पोलिसांनी या गुन्ह्यातील तिघांना अटक करण्यासोबतच शस्त्र व वाहनही ताब्यात घेतले आहे़