डिझेल दरवाढीमुळे यांत्रिक शेतीही अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 00:36 IST2021-07-08T22:37:01+5:302021-07-09T00:36:51+5:30
नांदूरवैद्य : शेतीचे काम करण्यासाठी बैलजोडीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच मजुरीने न उरकणारी कामे दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून बळिराजा आपल्या शेतीतील मशागतीच्या कामासाठी ट्रॅक्टरचा वापर करीत आहे. मात्र, डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे यंत्राद्वारेही शेती करणे कठीण जात आहे.

इगतपुरी तालुक्यात यंत्राद्वारे शेतीची मशागत करताना शेतकरी.
नांदूरवैद्य : शेतीचे काम करण्यासाठी बैलजोडीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच मजुरीने न उरकणारी कामे दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून बळिराजा आपल्या शेतीतील मशागतीच्या कामासाठी ट्रॅक्टरचा वापर करीत आहे. मात्र, डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे यंत्राद्वारेही शेती करणे कठीण जात आहे.
तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाताची शेती केली जाते. शेतकरी आता पर्यायी पिकांची लागवड करीत आहेत. दरम्यान, काही मोजके शेतकरी बैलजोडीद्वारे शेतीची कामे करून घेत आहेत. काही वर्षांपासून सालगड्याच्या मजुरीत वाढ झाल्याने बळिराजाने शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टरचा वापर सुरू केला आहे. शेतीतील संकटांमुळे अधिक उत्पन्न मिळत नसल्याने बळिराजाचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. बळिराजाला शेतीतून उत्पन्न घेण्यासाठी निसर्गावर अवलंबून राहावे लागते. त्यातच दरवर्षी नैसर्गिक संकटे येत असल्याने बळिराजाचे शेतीचे गणित एकदमच बिघडत चालले आहे. त्यातच मजुरांचे वाढते दर, उत्पादन कमी व खर्च मात्र अधिक अशा दुहेरी संकटात शेतीव्यवसाय सापडला आहे. त्यामुळे या संकटातून बाहेर पडण्यासाठी बळिराजाची धडपड सुरू आहे. आजही कोरोनाच्या सावटामध्ये शेतकरी खरीप हंगामाची पूर्वतयारी करीत आहे. मात्र, मजूर मिळत नसल्यामुळे त्यांना यंत्रावर अवलंबून राहावे लागत असून, अतिरिक्त खर्च करावा लागत आहे.
मजुरीचे व इंधनाचे दर
डिझेल - १०३ रुपये
नांगरणी - ७०० रुपये
मजुरी - ३०० रुपये
निंदणी - २५० रुपये
सोंगणी - ३५० रुपये
बैलजोडीच्या मदतीने शेती करावी तर एका जोडीची किंमत लाखाच्या घरात आहे आणि यंत्राद्वारे शेती करावी, तर इंधनांचे दर, मजुरी, तसेच महागडी जंतुनाशके औषधे, खते, आदींच्या किमती शेतीला परवडण्यासारख्या नाहीत. पावसाचा अनियमितपणा, वातावरणातील बदलांमुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे.
- नामदेव यंदे, शेतकरी, नांदूरवैद्य.