खुनांच्या तपासापेक्षा गुंतागुंत वाढविण्यात यंत्रणेला रस : गांधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 01:18 AM2019-08-21T01:18:20+5:302019-08-21T01:18:50+5:30
महात्मा गांधींच्या खुनापासून नरेंद्र दाभोलकर ते गौरी लंकेश या सर्वांच्या खुनामध्ये एकाच यंत्रणेचा हात असल्याने खुनी सापडला तरी त्यांचा म्होरक्या सापडत नाही. या सर्व खुनांचा तपास करण्यापेक्षा त्यात गुंतागुंत वाढवण्यातच पोलीस आणि प्रशासनाला अधिक रस असल्याचे प्रतिपादन महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधी यांनी केले.
नाशिक : महात्मा गांधींच्या खुनापासून नरेंद्र दाभोलकर ते गौरी लंकेश या सर्वांच्या खुनामध्ये एकाच यंत्रणेचा हात असल्याने खुनी सापडला तरी त्यांचा म्होरक्या सापडत नाही. या सर्व खुनांचा तपास करण्यापेक्षा त्यात गुंतागुंत वाढवण्यातच पोलीस आणि प्रशासनाला अधिक रस असल्याचे प्रतिपादन महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधी यांनी केले.
परशुराम साईखेडकर नाट्यगृहात आयोजित डॉ. दाभोलकर विवेक व्याख्यानमालेत ‘महात्मा गांधी से गौरी लंकेश तक’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. गांधीजींच्या हत्येतही पिस्तुलाने गोळी चालवणारा गवसला, मात्र त्याच्यामागील सूत्रधारांना शिक्षा होऊ नये, अशीच त्या खुनाची अर्धवट चौकशी झाली. त्याचप्रमाणे डॉ. दाभोलकर, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणांमध्ये साम्य असून, खुनी पकडले गेले तरी त्यांचे सूत्रधार मिळत नसल्याबाबत गांधी रोष व्यक्त केला. ज्या राष्टÑीय स्वयंसेवक संघाने या हत्या घडवून आणल्या आहेत, ते मात्र या सगळ्या हत्यांबद्दल नामानिराळे राहिले असल्याचा आरोपदेखील गांधी यांनी केला.
हत्येमागील सूत्रधार बेपत्ताच
दाभोलकरांच्या हत्येला सहा वर्ष उलटली तरी अद्यापही यंत्रणेला खरे सूत्रधार सापडलेले नाहीत. त्यामुळे आता या चारही हत्यांसाठी मिळून एक स्वतंत्र समितीच गठीत करण्याची मागणी करावी लागणार असल्याचे गांधी यांनी सांगितले.