एमएड आॅनलाइन सीईटीला सर्व्हर डाऊनचा फटका!
By admin | Published: May 28, 2017 10:11 PM2017-05-28T22:11:15+5:302017-05-28T22:11:15+5:30
दिंडोरी रोडवरील सेंटरमधील प्रकार . १२५ परीक्षार्थींचा संताप; पुनर्परीक्षेची तारीख कळविली जाणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : एमएड प्रवेशाच्या सीईटीसाठी नेमून दिलेल्या केंद्रावरील कॉम्प्युटर सेक्शनमध्ये बिघाड झाल्याने ऐनवेळी दुसऱ्या केंद्रावर पाठविण्यात आलेल्या सुमारे १२५ परीक्षार्थींची सर्व्हर डाऊनमुळे परीक्षाच होऊ न शकल्याची घटना रविवारी (दि़२८) दिंडोरी रोडवरील परीक्षा केंद्रावर घडली़ विशेष म्हणजे दुपारी बारा वाजेपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर ताटकळत ठेवल्याने त्यांचा संताप अनावर झाला़ अखेर सायंकाळी साडेसहा वाजता परीक्षा समन्वयकाने परीक्षेची पुढील तारीख प्रत्येकास कळविली जाईल, असे सांगत परीक्षार्थींची बोळवण केली़
बीएडनंतर एमएड करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने आॅनलाइन सीईटी अनिवार्य केली आहे़ या सीईटी परीक्षेसाठी सिडको व इंदिरानगरमधील डे केअर स्कूल असे दोन परीक्षा केंद्र देण्यात आले होते़ संपूर्ण नाशिक विभागातून या परीक्षेसाठी सकाळीच परीक्षार्थी शहरात दाखल झाले होते़ सिडकोतील परीक्षा केंद्रावर आॅनलाइन सीईटीची परीक्षा सुरळीत पार पडली; मात्र इंदिरानगरमधील डे केअर स्कूलमधील कॉम्प्युटर सेंटरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने तेथील संपूर्ण संगणक यंत्रणाच बंद पडली़