बलिप्रतिपदेच्या निमित्ताने पंचवटीत रेड्यांची मिरवणूक, स्वच्छतेचा दिला संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2018 10:23 PM2018-11-08T22:23:00+5:302018-11-08T22:27:51+5:30
बलिप्रतिपदा (पाडवा) निमित्ताने गुरुवारी सायंकाळी पंचवटी परिसरात विविध ठिकाणी रेडयांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
नाशिक : बलिप्रतिपदा (पाडवा) निमित्ताने गुरुवारी सायंकाळी पंचवटी परिसरात विविध ठिकाणी रेडयांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी बलिप्रतिपदेला नाशिक शहरात विशेषतः पंचवटी परिसरात रेडयांची सवाद्य मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करून आणि फटाक्यांची आतिषबाजी करून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत भाविक दुग्ध व्यवसायिक शेकडोंच्या संख्येने सहभागी झाले होते.
सायंकाळी रेड्यांना आकर्षक सजावट करून त्यांच्या पाठीवर विविध संदेश लिखित करण्यात आले होते. रेड्यांच्या पाठीवर काढलेले विविध स्वच्छता अभियान, देवदेवतांचे चित्र, असे विविध संदेश नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. सायंकाळी दुग्ध व्यवसायिकांनी रेड्यांची सजावट करून पूजन व आरती केली. त्यानंतर सायंकाळी 7 वाजता मिरवणूक सुरू झाली. नागचौकातून मिरवणुकीला प्रारंभ झाला. त्यानंतर रेडयांना मिरवणूक मार्गावर असलेल्या गंगाघाट, म्हसोबा महाराज, पंचवटी कारंजा, दिंडोरीरोड येथिल म्हसोबा महाराज मंदिरात दर्शनासाठी नेले होते. मिरवणूकीच्या पुढे विद्युत रोषणाई केलेले चारचाकी वाहन व ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करून भाविक नाचत होते. यावेळी विविध आकर्षक फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. पंचवटी परिसरातील नागचौक, कृष्णनगर, सरदारचौक, जुना आडगाव नाका, नांदूर, मानूर, मेरी, म्हसरूळ, मखमलाबाद, पेठरोड, दत्तनगर, नवनाथनगर, हिरावाडी, आडगाव, परिसरातील शेकडो दुग्ध व्यवसायिकांनी पंचवटीत बलिप्रतिपदा निमित्ताने रेडयांची सवाद्य मिरवणूक काढली होती.