तीन वर्षांपासून वैद्यकीय बिले लाल फितीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 01:47 AM2019-11-02T01:47:58+5:302019-11-02T01:48:19+5:30
एसटी कर्मचाऱ्यांना गंभीर आजारासाठी देय असलेली वैद्यकीय बिले सादर करूनही गेल्या तीन वर्षांपासून वैद्यकीय बिले अदा करण्यात आली नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. नाशिक मंडळातील शंभरपेक्षा अधिक कर्मचाºयांची बिले मुंबईतील मुख्यालयात अडकून पडली आहेत.
नाशिक : एसटी कर्मचाऱ्यांना गंभीर आजारासाठी देय असलेली वैद्यकीय बिले सादर करूनही गेल्या तीन वर्षांपासून वैद्यकीय बिले अदा करण्यात आली नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. नाशिक मंडळातील शंभरपेक्षा अधिक कर्मचाºयांची बिले मुंबईतील मुख्यालयात अडकून पडली आहेत. बिले मंजूर करणाºया डॉक्टरांची अपुरी संख्या आणि महामंडळाकडे पुरेसा निधी नसल्याने बिले देण्यास विलंब होत असल्याचे बोलले जात आहे.
राज्य परिवहन महामंडळाकडून कर्मचाºयांना पुरविण्यात येणाºया वैद्यकीय सुविधेमध्ये साध्या आणि गंभीर आजारासाठी बिले अदा केली जातात. यासाठी महामंडळाने वैद्यकीय दर निश्चित केलेले असून, स्थानिक पातळीवर वैद्यकीय अधिकाºयांच्या मंजुरीनंतर बिले दिली जातात तर गंभीर आजाराची बिले ही मुंबईतील मुख्यालयात पाठविली जातात. यामध्ये अपघातापासून ते शस्त्रक्रिया आणि डेंग्यूसारख्या आजारावर खर्च झालेली रक्कम महामंडळाकडून नियमानुसार दिली जातात; परंतु अशा प्रकारची वैद्यकीय बिले गेल्या तीन वर्षांपासून मुंबईत पडून असून, सदर बिले अद्यापही अदा करण्यात आलेली नाही. केवळ नाशिक मंडळातील ही बिले नसून राज्यातून अनेक विभागीय मंडळातील कर्मचाºयांची बिले मुख्यालयात अडकून पडली आहेत. कर्मचाºयांना वैद्यकीय कारणासाठी स्थानिक पातळीवर देखील वैद्यकीय सुविधा पुरविण्यात आलेली आहे.
निधी नसल्याने दिरंगाई
महामंडळाच्या खात्यामध्ये पुरेसा निधी नसल्यामुळे कर्मचाºयांना बिले अदा करण्यास विलंब होत असल्याची चर्चा आहे. काही कर्मचाºयांची वैद्यकीय बिले देण्यात आली; मात्र महामंडळाच्या खात्यामध्ये पैसेच नसल्याने काहींचे धनादेश परत पाठविण्यात आल्याचीही चर्चा महामंडळात सुरू आहे. मुंबईत महामंडळातील डॉक्टर्स हे केवळ एका तासासाठी उपलब्ध होत असल्याने त्या काळातच बिलांची फाईल उघडली जाते. त्यामुळे कामाचा वेग अतिशय कमी असल्यामुळे दिरंगाई होत असल्याचीदेखील चर्चा आहे.