युक्रेनमधून परतणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतात वैद्यकीय शिक्षण : अमित देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2022 01:37 AM2022-03-03T01:37:38+5:302022-03-03T01:38:10+5:30
रशिया व युक्रेन या देशांतील युद्धामुळे वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी मदतीच्या दृष्टिकोणातून राज्य सरकार पंतप्रधानांसोबत राज्यपालांच्या माध्यमातून चर्चा करणार आहे. यासंदर्भात आरोग्य विद्यापीठाने पुढाकार घेत मायदेशी परतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान रोखण्यासाठी अभ्यासात्मक अहवाल सादर करण्याच्या सूचना करतानाच यासंदर्भातही व्हीजन डॉक्युमेंट तयार करण्याचे आवाहन विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी केल्या आहेत.
नाशिक: रशिया व युक्रेन या देशांतील युद्धामुळे वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी मदतीच्या दृष्टिकोणातून राज्य सरकार पंतप्रधानांसोबत राज्यपालांच्या माध्यमातून चर्चा करणार आहे. यासंदर्भात आरोग्य विद्यापीठाने पुढाकार घेत मायदेशी परतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान रोखण्यासाठी अभ्यासात्मक अहवाल सादर करण्याच्या सूचना करतानाच यासंदर्भातही व्हीजन डॉक्युमेंट तयार करण्याचे आवाहन विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी केल्या आहेत.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २१ वा दीक्षांत सोहळा राज्यपाल तथा विद्यापीठचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेत बुधवारी (दि.२) ऑनलाइन पद्धतीने पार पडला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर कुलगुरू तथा निवृत्त लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर, प्रति-कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, अधिष्ठाता डॉ. सचिन मुंब्रे, डॉ. जयंत पळसकर, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. धनाजी बागल, डॉ. राजश्री नाईक, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, वित्त व लेखाधिकारी एन.व्ही. कळसकर आदी उपस्थित होते. यावेळी अमित देशमुख यांनी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी वैद्यकीय महाविद्यालयाचा लवकरच प्रारंभ होणार असल्याचे नमूद करतानाच आरोग्य शिक्षण व संशोधनासाठी आरोग्य क्षेत्रातील विद्यार्थ्यांना संधी मिळणार असल्याचे अधोरेखित केले. आरोग्य शिक्षणातील सर्व विद्याशाखांचा समावेश असलेल्या ‘इंटिग्रेटेड मेडिकल कॉम्प्लेक्स’चाही समावेश यात करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
--
कोविड-१९ काळात आरोग्य विद्यापीठाने ऑफलाइन पद्धतीने प्रत्यक्ष परीक्षा घेऊन विद्यापीठाने राष्ट्रीय स्तरावर आदर्श निर्माण केला. विद्यापीठ हे संशोधनाचे केंद्र होऊन समाज हिताच्या दृष्टिकोणातून सर्वच विद्याशाखांनी एकत्रित काम करणे आवश्यक आहे. - भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल