२३ मार्चपासून रखडलेल्या वैद्यकीय परीक्षांना अखेर प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:11 AM2021-06-11T04:11:26+5:302021-06-11T04:11:26+5:30

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या २३ मार्चपासून रखडलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा अखेर गुरुवार (दि. १०)पासून सुरू झाल्या असून, ...

Medical examinations, which have been stalled since March 23, have finally started | २३ मार्चपासून रखडलेल्या वैद्यकीय परीक्षांना अखेर प्रारंभ

२३ मार्चपासून रखडलेल्या वैद्यकीय परीक्षांना अखेर प्रारंभ

Next

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या २३ मार्चपासून रखडलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा अखेर गुरुवार (दि. १०)पासून सुरू झाल्या असून, या परीक्षांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. कोरोनामुळे अनुपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येणार असल्याची घोषणा विद्यापीठाकडून करण्यात आलेली असतानाही पहिल्याच दिवशी ९१.१ टक्के विद्यार्थ्यांनी वैद्यकीय परीक्षांना उपस्थिती नोंदविल्याची माहिती विद्यापीठ परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी दिली.

कोरोना संकटामुळे या परीक्षा यापूर्वी तीन वेळा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. या परीक्षा सुरुवातीला २३ मार्चपासून सुरू होणार होत्या; परंतु कोरोनामुळे या परीक्षा पुढे ढकलून १९ एप्रिलपासून घेण्याचे पुनर्नियोजन करण्यात आले. मात्र, कोरोनाचा प्रभाव आणखीनच वाढल्याने या परीक्षा २ जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र, २ जूनपर्यंत लॉकडाऊन सुरूच राहिल्याने या परीक्षा आणखी पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता होती. परंतु, या परीक्षांसाठी काही विद्यार्थी न्यायालयात गेल्याने न्यायालयाने १० जूनपासून परीक्षा घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुरुवारपासून आता एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीयूएमएस, बीएचएमएस, बीपीटीएच, बीओटीएच आणि बी.एस्सी. नर्सिंग या पदवी परीक्षांच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षांच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा येत्या १६ ऑगस्टपासून घेण्यात येणार आहेत. या लेखी परीक्षा २४ जून २०२१ पासून नियोजित होत्या. परंतु, कोविड-१९ ची परिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने परीक्षा काही कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आली होती.

इन्फो-

कोरोनामुळे १८ विद्यार्थी परीक्षेला मुकले

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे पहिल्या दिवशी राज्यभरातील १६७ परीक्षा केंद्रांवर सकाळच्या सत्रात सुमारे ४ हजार ९९७ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. यातील ४ हजार ५४८ विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून परीक्षा दिली, तर ४४९ विद्यार्थी अनुपस्थित होते. यापैकी परीक्षेला कोरोनामुळे १८ विद्यार्थ्यांना मुकावे लागले, तर १७ विद्यार्थी रॅपिड अँटिजन टेस्ट अथवा आरटीपीसीआर असे कोणतेही कोरोनाबाधित असल्याचे प्रमाणपत्र दाखल करू शकले नाहीत, तर ४१४ विद्यार्थ्यांनी वि्द्यापीठाच्या परीक्षा विभागाला अनुपस्थित राहण्याविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे केवळ कोरोनाची बाधा झालेल्या विद्यार्थ्यांनाच पुन्हा परीक्षेला बसता येणार आहे.

Web Title: Medical examinations, which have been stalled since March 23, have finally started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.