वैद्यकीय अधीक्षकाचा पदभार काढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 12:05 AM2018-11-29T00:05:23+5:302018-11-29T00:22:00+5:30
अनागोंदी कारभाराने गाजत असलेल्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात अखेर शासनाला लक्ष घालावे लागले असून, येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश कोशिरे यांच्याविषयी होणाऱ्या तक्रारींची दखल घेत त्यांना तडकाफडकी या पदावरून मुक्त करण्याचा निर्णय आरोग्य संचालकांना घ्यावा लागला आहे. रुग्णालयाचे व्यवस्थापन व रुग्णांचे हित लक्षात घेता अनुभवी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला आहे.
नाशिक : अनागोंदी कारभाराने गाजत असलेल्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात अखेर शासनाला लक्ष घालावे लागले असून, येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश कोशिरे यांच्याविषयी होणाऱ्या तक्रारींची दखल घेत त्यांना तडकाफडकी या पदावरून मुक्त करण्याचा निर्णय आरोग्य संचालकांना घ्यावा लागला आहे. रुग्णालयाचे व्यवस्थापन व रुग्णांचे हित लक्षात घेता अनुभवी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला आहे. शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाचे व्यवस्थापन केल्या काही महिन्यांपासून पूर्णत: ढासळून अनागोंदी व गैरप्रकाराने गाजू लागले आहे. त्यात विशेष करून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश कोशिरे यांच्या विषयी प्रामुख्याने सहअधिकारी व परिचारिकांच्या तक्रारी होत्या. अपमानास्पद वागणूक देणे, रुग्णांशी उर्मट वर्तन करणे आदी स्वरूपामुळे रुग्णालयातील व्यवस्थापन कोलमडून पडले होते. त्याचा परिणाम थेट संदर्भ सेवा रुग्णालयात उपचारासाठी येणाºया रुग्णांवर होऊन रुग्णालयाविषयी रुग्णांमध्येच असुरक्षितता निर्माण झाली होती. सफाई कर्मचाºयांकडून रुग्णांवर उपचार करणे, मंजूर नसलेल्या पदांवर वैद्यकीय अधिकाºयांची भरती करणे, कोट्यवधीची यंत्रसामग्री धूळ खात पडणे, कॅन्सरवर उपचारासाठी तंत्रज्ञ नसणे असे प्रकार या दरम्यान उघडकीस आले. रुग्णालयावरील विश्वास कमी झाल्याने तेथे दाखल होणाºया रुग्णांच्या संख्येवरही त्याचा परिणाम झाला, परिणामी अवघड शस्त्रक्रियांची संख्याही घटली. या संदर्भातील तक्रारींची दखल घेत गेल्या आठवड्यात राज्याचे आरोग्य संचालक डॉ. संजीव कांबळे यांनीही संदर्भ सेवा रुग्णालयाला अचानक भेट देऊन पाहणी केली होती तसेच वैद्यकीय अधीक्षकांची झाडाझडतीही घेतली होती.
तपासणी करणार
कामकाजात सुधारणा होत नसल्याचे पाहून या सर्व पार्श्वभूमीवर बुधवारी ‘संदर्भ’चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश कोशिरे यांच्याकडून रुग्णालय व्यवस्थापनाचा पदभार काढून घेण्यात आला असून, जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्याकडे तातडीने पदभार देण्याचे आदेश आरोग्य संचालकांनी दिले आहेत. या आदेशानुसार डॉ. कोशिरे हे यापुढे रुग्णालयात फक्त रुग्णांची तपासणी करतील.