सुखांत जीवनासाठी वैद्यकीय इच्छापत्र अत्यावश्यक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:11 AM2021-05-28T04:11:43+5:302021-05-28T04:11:43+5:30
नाशिक : मृत्यू हे शाश्वत सत्य असले तरी जगण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र, सुखांत जीवनासाठी वैद्यकीय इच्छापत्र असावे, ...
नाशिक : मृत्यू हे शाश्वत सत्य असले तरी जगण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र, सुखांत जीवनासाठी वैद्यकीय इच्छापत्र असावे, असे मत ज्येष्ठ विधिज्ञ अविनाश भिडे यांनी व्यक्त केले.
वसंत व्याख्यानमालेतील सत्ताविसावे पुष्प त्यांनी गुंफले. स्व. निर्मला केशव गरुड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
मृत्यूबद्दल समाजात एक भीती असून त्याविषयी सामूहिक चर्चा होणे आवश्यक आहे. त्यामुळे जीवनाचा सुखांत कसा होईल, हा विचार रुजविण्याची गरज आहे. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे; परंतु कसे मरावे याचे अधिकार घटनेत नसून इच्छामरणाविषयी कायदा नाही. काही देशांत मात्र हा कायदा असल्याचे ॲड. भिडे यांनी स्पष्ट केले. गंभीर आजारात रुग्ण मरणासन्न असल्यास डॉक्टरी प्रयत्न अपुरे पडतात. अशा वेळी मृत्यू हातात नसला तरी कसे जगावे, हे आपण ठरवू शकतो. सक्रिय इच्छामरण भारतात गुन्हा असला तरी जगात याविषयी कायदा असल्याचे ॲड. भिडे यांनी सांगितले.
सक्रिय आणि निष्क्रिय इच्छामरणाविषयी भारतात कायदा नाही. अशा वेळी आपल्या ‘सुखांत जीवनाचा’ या पुस्तकातील संदर्भ देऊन ॲड. अविनाश भिडे यांनी रुग्णास वैद्यकीय इच्छापत्र करण्याची तरतूद असावी, असे विशद केले. गंभीर आजाराच्या रुग्णावर उपचार करताना अशी वेळ येते की, तिथे कुठलीही मात्रा चालत नाही. अशा परिस्थितीत रुग्णाचे वैद्यकीय इच्छापत्र असल्यास डॉक्टरांसह नातेवाइकांनाही निर्णय घेणे सहजसाध्य होईल.
म्हणून प्रत्येकाने मृत्युपत्र बनवितानाच वैद्यकीय इच्छापत्र तयार करणे सोयीचे ठरेल, असेही ॲड. भिडे यांनी सांगितले. याप्रसंगी व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक केले, तर चिटणीस संगीता बाफना यांनी आभार मानले.
आजचे व्याख्यान
वक्ते : ॲड. भानुदास शौचे
विषय : नेताजी आणि सावरकर
फोटो
२७ॲड. भिडे