शहरात मध्यम तर गंगापूर धरण समुहात जोर ‘धार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 06:57 PM2020-08-12T18:57:26+5:302020-08-12T18:58:11+5:30
दिवसभरात गंगापूर धरण समुमहाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे गंगापूर धरणाच्या जलसाठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे.
नाशिक : शहर व परिसरात बुधवारी (दि.१२) श्रावणसरींचा दमदार वर्षाव झाला. सकाळपासूनच ढगाळ हवामान कायम राहिले. दुपारी एक वाजेपासून पावसाला शहरासह उपनगरांमध्येही सुरुवात झाली. दिवसभर पावसाच्या हलक्या व मध्यम सरींची रिपरिप सुरुच असल्याने नाशिककर ओलेचिंब झाले. सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने अशी हजेरी लावल्याने समाधान व्यक्त होत आहे. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ९.२ मि.मी इतका पाऊस शहरात मोजला गेला. नाशिकरोडपासून द्वारकापर्यंत दुपारी तीन ते पाच या वेळेत जोरदार पाऊस झाला.
शहर व परिसरात गेल्या सोमवारी (दि.१०) सायंकाळी पावसाच्या मध्यम सरींचा वर्षाव झाला होता. तत्पुर्वी गेल्या गुरुवारी पावसाने दिलासादायक हजेरी लावली होती. तेव्हा १३ मिमी इतका पाऊस शहरात झाल्याची नोंद हवामान निरिक्षण केंद्रात करण्यात आली होती.
बुधवारी दिवसभर ढगाळ हवामान असल्याने वातावरणात उकाडा जाणवत होता. दुपारी साडेबारा वाजेपासून शहराच्या मध्यवर्ती भागात हलक्या सरींचा वर्षाव सुरु झाला. दुपारी तीन वाजेपासून उपनगरांमध्ये पावसाने जोर धरला. पुढील दोन तास विहितगाव, नाशिकरोड, जेलरोड, उपनगर, अशोकामार्ग, द्वारका, वडाळागाव, इंदिरानगर या भागात जोरदार पाऊस झाला. सहा वाजेनंतर संध्याकाळी पावसाचा जोर ओसरला होता. दिवसभर झालेल्या पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाल होता. नाशिककरांना जोरदार संततधारेची प्रतीक्षा अद्यापही कायम आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी जुलैपाठोपाठ आगॅस्टमध्येही अद्याप मुसळधार पाऊ स झालेला नाही. अद्याप गोदावरी या हंगामात दुथडी भरून वाहताना नजरेस पडलेली नाही. गेल्या वर्षी गोदावरीला महापूर याच महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आला होता. बुधवारी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अहल्यादेवी होळकर पूलाखालून केवळ ६४४ क्युसेक इतके पाणी रामकुंडात प्रवाहित होते. दरम्यान दिवसभरात गंगापूर धरण समुमहाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे गंगापूर धरणाच्या जलसाठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे.गंगापूर समुहातील पर्जन्यमान (सकाळी ६ ते संध्या: ६ वाजेपर्यंत)
गंगापूर : ३० मिमी.
गौतमी-३२ मिमी.
त्र्यंबकेश्वर-४३ मिमी.
आंबोली-६७ मिमी.
काश्यपी-१० मिमी.