मनमाड पाणीपुरवठा योजनेसाठी आज मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 01:26 AM2019-06-12T01:26:39+5:302019-06-12T01:27:13+5:30
गेल्या अनेक वर्षांपासून शहरात निर्माण झालेला पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी करंजवण पाणीपुरवठा योजनेसंदर्भात आज मुंबई येथे मंत्रालयात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली. उद्या, बुधवारी (दि. १२) मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली असून, ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.
मनमाड : गेल्या अनेक वर्षांपासून शहरात निर्माण झालेला पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी करंजवण पाणीपुरवठा योजनेसंदर्भात आज मुंबई येथे मंत्रालयात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली. उद्या, बुधवारी (दि. १२) मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली असून, ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.
मनमाड शहरासाठीच्या करंजवण थेट पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा योजनेवर या बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली. या योजनेची प्रकल्प किंमत २९७ कोटी असून, त्यासाठीचा पंधरा टक्के मार्जिन मनी मनमाड पालिका ब वर्ग असल्याने कशा पद्धतीने भरणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पालिकेसमोर चौदावा वित्त आयोग, सीएसआर निधी किंवा महाराष्टÑ शासनाकडून सलवत मिळवणे असे तीन पर्याय असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या योजनेसाठी वितरण व्यवस्थेसह प्रस्ताव दाखल करण्यात यावा, अशी सूचना जलसंपदामंत्री महाजन यांनी मांडली. यावेळी शासनाचा पाटबंधारे विभाग, महाराष्टÑ जीवन प्रधिकरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह खासदार डॉ. भारती पवार, आमदार पंकज भुजबळ, जिल्हा परिषद सभापती मनीषा पवार, नगराध्यक्ष पद्मावती धात्रक, उपनगराध्यक्ष राजेंद्र अहिरे, गटनेते गणेश धात्रक, मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर, माजी आमदार जगन्नाथ धात्रक, राजाभाऊ देशमुख, भाजप जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव, जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, शहराध्यक्ष जयकुमार फुलवाणी, सचिन दराडे, कांतिलाल लुणावत, विनय आहेर, महेंद्र शिरसाठ, संगीता पाटील, सुरेखा मोरे यांच्यासह अन्य नगरसेवक उपस्थित होते.
या सर्व बाबींवर तोडगा काढण्यासाठी बुधवारी ११ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळासमवेत बैठक आयोजित करण्यात आली असून, मनमाड शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्यासाठी या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.
करंजवण योजनेसाठीच्या आंदोलनानंतर बैठकीचा निर्णय
मनमाड शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रस्तावित असलेल्या करंजवण योजनेला तात्काळ मंजुरी मिळून काम सुरू व्हावे यासाठी शहरातील डॉ. अमोल गुजराथी, डॉ. सुहास जाधव, मनोज गांगुर्डे, सतीश न्हायदे, अमित बाकलीवाल यांनी आमरण उपोषण केले होते. तीन दिवस सुरू असलेल्या या आंदोलनाला शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटना व जनतेने उत्स्फूर्त पाठिंबा दिला होता. मनमाड शहरासाठीच्या करंजवण योजनेबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करावी, अशी मागणी जि.प.च्या अर्थ सभापती मनीषा पवार यांनी जलसंपदामंत्र्यांकडे लेखी पत्राद्वारे केली होती. जलसंपदामंत्री गिरीश महाजन व खासदार भारती पवार यांच्या मध्यस्तीनंतर या योजनेबाबत ११ तारखेला मंत्रालयात बैठक आयोजित करण्याचे आश्वासन मिळाल्याने उपोषण मागे घेण्यात आले होते.