वाडा कोसळल्यानंतर गावठाण मिळकतधारकांची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 01:33 AM2018-08-07T01:33:48+5:302018-08-07T01:34:17+5:30
जुन्या नाशकातील वाडा कोसळल्यानंतर आता गावठाण पुनर्विकासासाठी क्लस्टरची चर्चा सुरू झाली असून, मध्य नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी येत्या गुरुवारी (दि.९) वाडा मालकांची बैठक बोलावली आहे.
नाशिक : जुन्या नाशकातील वाडा कोसळल्यानंतर आता गावठाण पुनर्विकासासाठी क्लस्टरची चर्चा सुरू झाली असून, मध्य नाशिकच्या आमदारदेवयानी फरांदे यांनी येत्या गुरुवारी (दि.९) वाडा मालकांची बैठक बोलावली आहे. जुन्या नाशिकमधील वाड्यांची अवस्था बिकट आहे. महापालिकेच्या म्हणण्यानुसार ३९७ धोकादायक वाडे असले तरी प्रत्यक्षात त्यापेक्षा अधिक वाडे धोकादायक आहेत. त्यामुळे गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता आहे. शासनाच्या वतीने गावठाण विकासासाठी क्लस्टर योजना असली तरी नाशिकमध्ये किमान १ हजार चौरस फूट क्षेत्र असेल तरच त्याचा विकास होऊ शकतो, असा प्रस्ताव आहे. त्यामुळे एका वाड्याचा विकास सहज शक्य नसून दोन ते चार वाडे एकत्र करूनच तो शक्य आहे. त्यामुळे लोकांनी यासाठी विहित मुदतीत सहभागी होऊन अर्ज करणेदेखील बंधनकारक आहे. तरच त्याला मान्यता मिळू शकेल यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आणि क्लस्टर विकासाची मानसिकता तयार करण्यासाठी ही बैठक घेण्यात येणार असल्याचे आमदारदेवयानी फरांदे यांनी सांगितले.