साथीच्या आजारांवर गाजली प्रभाग समितीची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:19 AM2021-08-14T04:19:22+5:302021-08-14T04:19:22+5:30
पंचवटी : पंचवटी विभागाच्या ऑनलाईन प्रभाग सभेत डेंग्यू, मलेरिया, चिकन गुनिया साथरोगाविषयी अनेक प्रश्न उपस्थित करीत लोकप्रतिनिधींनी मलेरिया विभागाला ...
पंचवटी : पंचवटी विभागाच्या ऑनलाईन प्रभाग सभेत डेंग्यू, मलेरिया, चिकन गुनिया साथरोगाविषयी अनेक प्रश्न उपस्थित करीत लोकप्रतिनिधींनी मलेरिया विभागाला कोंडीत पकडले. लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या तक्रारींची तत्काळ दखल घ्यावी, असे आदेश नवनिर्वाचित प्रभाग सभापती मच्छिंद्र सानप यांनी संबंधित विभागाला दिले.
प्रभाग समितीची सभा ऑनलाईन पद्धतीने शुक्रवारी सभापती सानप यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी नगरसेवकांनी प्रभागातील समस्या मांडून त्या सोडविण्याची मागणी केली. शहरात कोरोना, डेंग्यू, मलेरिया, चिकन गुनिया आदी साथरोग प्रादुर्भाव वाढला आहे. प्रभाग ३ मध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने उपाययोजना करण्याची मागणी नगरसेवक पूनम मोगरे यांनी केली. अरुण पवार यांनी विभागात जागोजागी पडलेले खड्डे बुजवावेत असे सुचविले तर सरिता सोनवणे यांनी प्रभाग क्रमांक चारमध्ये स्लम भाग असून डासांची उत्पत्ती वाढत आहे ते नियंत्रणात आणण्यासाठी औषध धूर फवारणी करावी, समर्थ नगर, कर्ण नगर, पवार कॉलनी भागात रस्त्यांची दुरवस्था झाली असून नागरिकांना पावसाळ्यात चिखलातून मार्गक्रमण करावे लागते त्यामुळे पक्का रस्ता करावा अशी मागणी केली.
इन्फो====
पंचवटी विभागातील सर्व प्रभागात धूर फवारणी केली जाईल. स्वच्छता व घनकचरा विभागाकडून घरोघरी जाऊन डेंग्यू तपासणी सुरू केली आहे. पंचवटीत अनेक भागात खड्डे आहेत. स्वतः बऱ्याच ठिकाणी स्वतः पाहणी करून हे खड्डे लवकर बुजविण्यासाठी बांधकाम विभागास सूचना केल्या आहेत.
-मच्छिंद्र सानप, सभापती, पंचवटी प्रभाग