पाथर्डी गावात कायदा सुव्यवस्थेसाठी बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 11:42 PM2019-02-24T23:42:14+5:302019-02-25T00:14:32+5:30
पाथर्डी गावात बाहेरून आलेल्या मंडळींमुळे गुन्हेगारीत वाढ होत असून, त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात करण्यात आली आहे.
इंदिरानगर : पाथर्डी गावात बाहेरून आलेल्या मंडळींमुळे गुन्हेगारीत वाढ होत असून, त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात करण्यात आली आहे. तीन दिवसांपूर्वी पाथर्डी गावात सुखदेवनगरलगत रितेश पाईकराव या एकोणीस वर्षांच्या तरुणाचा सात संशयित आरोपींनी खून केला. या पार्श्वभूमीवर वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ग्रामस्थांनी बैठक घेऊन गावातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चर्चा केली.
पाथर्डी गावात दिवसागणिक गावाबाहेरील नागरिकांचे वास्तव्य वाढत असून, यातील अनेकांना नाव, पत्ता याविषयी कोणालाही माहिती नसतेय त्यातूनच गुन्हेगारी वाढत असून, गावात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ लागल्याने भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या घरमालकांवर गुन्हे दाखल करावे, तसेच गावात पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी केली आहे.
यावेळी नगरसेवक भगवान दोंदे, सुदाम डेमसे, पोलीस निरीक्षक पांडुरंग पाटील यांच्यासह गौतम दोंदे, लखन कोंबडे, सुरेश गवळी, हरी गांगुर्डे, कमळाबाई पवार आदी उपस्थित होते.