मालेगावी आदर्श आचारसंहितेसंदर्भात बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 01:38 AM2019-03-12T01:38:29+5:302019-03-12T01:39:16+5:30
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. मालेगाव मध्य व मालेगाव बाह्य मतदारसंघाची संयुक्त बैठक सहायक निवडणूक निर्णय अधिकारी (मध्य) विजयानंद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
मालेगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. मालेगाव मध्य व मालेगाव बाह्य मतदारसंघाची संयुक्त बैठक सहायक निवडणूक निर्णय अधिकारी (मध्य) विजयानंद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी (बाह्य) गणेश मिसाळ उपस्थित होते.
यावेळी मालेगाव शहरासह ग्रामीण भागातील राजकीय पक्षांचे फलक, होर्डिंग्ज, फ्लेक्स तातडीने हटविण्याच्या सूचना आचारसंहिता पथकप्रमुख गटविकास अधिकारी आनंद पिंगळे व मनपा उपायुक्त नितीन कापडणीस यांना देण्यात आल्या. विश्रामगृहाचा वापर राजकीय कामासाठी करू नये याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. याकामासाठी आवश्यक तो पोलीस बंदोबस्त तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. बैठकीस तहसीलदार चंद्रदीप राजपूत, अन्नपुरवठा अधिकारी नरेश बहिरम, निवडणूक नायब तहसीलदार रमेश वळवी, पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले, अजित हगवणे, बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता आर. एस. काथेपुरी उपस्थित होते.
राजकीय पक्षांनीही गिरवले व्हीव्हीपॅटचे धडे
पेठ : आगामी लोकसभा निवडणुकीची प्रक्रि या सुरू झाली असून, त्या दृष्टीने प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. या निवडणुकीत सर्वांचे आकर्षण ठरलेल्या व्हीव्हीपॅट मशीनबाबत सर्वच राजकीय पक्षांना माहिती व्हावी म्हणून तालुकास्तरावर सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना या मशीनचे प्रशिक्षण देण्यात आले. तहसीलदार हरीश भामरे यांच्या उपस्थितीत पेठ तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी आचारसंहितेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. व्हीव्हीपॅट मशीनबाबत मार्गदर्शन करून त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले.
याप्रसंगी पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील, निवासी नायब तहसीलदार बाळासाहेब नवले, आर. व्ही. वराडे यांच्यासह सर्वपक्षीय तालुकाध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते.