बाजार समितीची बैठक अवघ्या पाच मिनिटांत गुंडाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 06:34 PM2019-09-05T18:34:49+5:302019-09-05T18:37:23+5:30
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे यासाठी एका संचालकाच्या नातेवाइकाकडून ३ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी विद्यमान सभापती चुंभळे यांच्यावर गेल्या महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. चुंभळेंवर लाचखोरीचा ठपका असल्याने
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : गेल्या सोमवारी गणपूर्तीअभावी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची तहकूब केलेली बैठक गुरुवारी बोलाविण्यात आली खरी, मात्र या बैठकीला लाचखोरीचा ठपका असलेल्या सभापती शिवाजी चुंभळे यांनी हजेरी लावल्याने अवघ्या पाच मिनिटांत बैठक गुंडाळण्यात आली. बैठकीला चुंभळे आणि पिंगळे या दोन्ही गटांचे संचालक उपस्थित होते. पिंगळे गटाच्या संचालकांना बाजू मांडू न देता अधिकाराची गळचेपी केल्याने उपसभापती युवराज कोठुळे आणि सचिव अरुण काळे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी गटाच्या सात संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांची भेट घेऊन केली आहे.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे यासाठी एका संचालकाच्या नातेवाइकाकडून ३ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी विद्यमान सभापती चुंभळे यांच्यावर गेल्या महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. चुंभळेंवर लाचखोरीचा ठपका असल्याने जिल्हा उपनिबंधकांनी लादलेल्या निर्बंधांमुळे धोरणात्मक व आर्थिक व्यवहारासंबंधी कामकाजात सहभागी करून घेऊ नये, असे पत्र बाजार समिती सचिवांना दिले होते आणि कामकाजात सहभागी झाले तर त्याची जबाबदारी सचिवांवर राहील, असे पत्रात नमूद केले होते. त्यावर चर्चा करण्यासाठी गेल्या सोमवारी उपसभापती कोठुळे यांनी तातडीची बैठक बोलावली होती. चुंभळे यांच्यावर कारवाई झाल्याने त्यांचे सह्यांचे अधिकार काढल्याने त्यावर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली खरी मात्र स्वत: कोठूळे व अन्य काही संचालक गैरहजर राहिल्याने बैठक तहकूब करण्यात आली होती. ही तहकूब बैठक गुरुवारी सकाळी अकरा वाजता झाली. या बैठकीस दोन्ही गटांचे संचालक उपस्थित होते. उपसभापती कोठुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू झाली त्यावेळी सभापती शिवाजी चुंभळेदेखील उपस्थित होते.