संतोषा, भागडी उत्खननप्रकरणी आज मंत्रालयात बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:19 AM2021-08-24T04:19:42+5:302021-08-24T04:19:42+5:30
ब्रह्मगिरी येथील अवैध उत्खननामुळे पर्यावरणाचा आणि येथील जैवविविधतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी टास्क फोर्स स्थापन केला आहे. ...
ब्रह्मगिरी येथील अवैध उत्खननामुळे पर्यावरणाचा आणि येथील जैवविविधतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी टास्क फोर्स स्थापन केला आहे. या माध्यमातून संतोषा व भागडी येथील अवैध उत्खननावर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ब्रह्मगिरी डोंगरावर अवैध उत्खनन झाल्याची बाब समोर आल्यानंतर याप्रकरणी दोषी आढळलेल्या खाणमाफियाला दीड कोटीचा दंड देखील आकारण्यात आला आहे तर संबंधित अधिकाऱ्यास निलंबित देखील करण्यात आले आहे.
ब्रह्मगिरी पर्वतरांगेतील बेलगाव ढगा येथील संतोषा व भागडी हे जैवविविधतेने संपन्न असे डोंगर असून पर्यावरणासाठी देखील महत्त्वाचे आहेत. अवैध उत्खननामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला असून रहिवाशांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाल्याचा मुद्दा पर्यावरणप्रेमींनी मांडला आहे. खाणमाफियांकडून हे डोंगर पोखरण्याचे काम सुरू असल्याने त्याविरोधात आवाज उठविण्यात आला आहे. याप्रकरणी वारंवार पर्यावरण मंत्रालयाशी पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे.
त्यामुळे आता या प्रकरणी मंगळवारी पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या दालनात दुपारी १२.३० वाजता बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. यासाठी ब्रह्मगिरी बचाव कृती समितीचे सात सदस्य तसेच संबंधित गावचे सरपंच तसेच जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना चर्चेसाठी बोलावण्यात आले आहे. या बैठकीत टास्क फोर्सचे कार्य तसेच कारवाई, वनविभागाचा अहवाल याबाबत सविस्तर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.