वाङ्मयीन विचारमंथन होण्यासाठी संमेलनाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 12:13 AM2019-06-03T00:13:04+5:302019-06-03T00:13:20+5:30
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याची कल्पना खूपच चांगली आहे़ हल्लीच्या काळात साहित्य आणि साहित्याचे वाचक या संदर्भातील स्थिती फारशी समाधानकारक राहिलेली नाही. माध्यमांचे अतिक्रमण, साहित्याचा घसरता दर्जा आणि पुस्तकांपासून दूर चाललेला वाचकवर्ग यामुळे साहित्याच्या क्षेत्रात फारसे उत्साहाचे वातावरण दिसून येत नाही,
नाशिकमध्येसाहित्य संमेलन का व्हावे?
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याची कल्पना खूपच चांगली आहे़ हल्लीच्या काळात साहित्य आणि साहित्याचे वाचक या संदर्भातील स्थिती फारशी समाधानकारक राहिलेली नाही. माध्यमांचे अतिक्रमण, साहित्याचा घसरता दर्जा आणि पुस्तकांपासून दूर चाललेला वाचकवर्ग यामुळे साहित्याच्या क्षेत्रात फारसे उत्साहाचे वातावरण दिसून येत नाही, असे म्हटले जाते़ तरीही काही प्रमाणात आशादायक चित्र आहे असे म्हणता येईल, कारण वेगवेगळ्या विषयांवर नवनवीन पुस्तके निघत आहेत़ विशेषत: बालसाहित्य विषयावर वेगवेगळे कवी आणि लेखक लेखन करीत आहेत़ छोट्या-मोठ्या शहरांमधून वेगवेगळ्या पुस्तकांची प्रदर्शने लागलेली दिसतात़ यात तरुण वर्ग, महिला आणि बालवाचक यांच्या अभिरुचीच्या पुस्तकांना मागणी वाढली पाहिजे़ वाङ्मयीन विचारांचे आदान-प्रदान घडले पाहिजे़ विचारमंथन व्हायला पाहिजे यासाठीच नाशिकला संमेलन व्हावे़
आजच्या काळात ग्रामीण, आदिवासी, पुरोगामी, युवक आणि बालसाहित्य संमेलने छोट्या-मोठ्या शहरात होत असतात़ परंतु अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामुळे साहित्य क्षेत्रात मोठे मंथन घडून येते़ त्यामुळे आजच्या काळात लेखक, कवी आणि वाचक यांना काहीशी निराशाजनक वाटणारी परिस्थिती बदलण्यासाठी साहित्य संमेलन निश्चितपणे उपयुक्त ठरू शकते़ नाशिकला यापूर्वी वेगवेगळ्या प्रकारची साहित्य संमेलने झालेली आहेत़ त्यामुळे साहित्य चळवळीवर त्या-त्या काळात थोडाफार परिणाम झालेला आहे़ यासाठी कायमस्वरूपी साहित्य क्षेत्रात मोठे कार्य होण्यासाठी नाशिक शहरात आगामी काळात मोठे
साहित्य संमेलन होण्याची गरज आहे़ आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या रूपाने ही संधी नाशिकला मिळू शकते़ यासाठी नाशिकने उत्तर महाराष्ट्राच्या साहित्य चळवळीचे नेतृत्व केले पाहीजे, तरच या परिसरातील साहित्य चळवळ खऱ्या अर्थाने व्यापक होऊन तिला चांगला आकार प्राप्त होऊ शकेल, अशी खात्री वाटते़
- उत्तम कोळगावकर
साहित्य संमेलनात विविध विषयांवर चर्चासत्र आणि परिसंवाद होतात़ पुस्तकांचे स्टॉल लागतात़ या माध्यमातून प्रयत्न होताना दिसतात़ मराठी माणसांनी मराठी भाषेतली वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके वाचली पाहिजेत, यासाठी लेखक-पुस्तक-वाचक मेळाव्यासारखे उपक्रम राबविले पाहिजेत़ वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्य संमेलनांकडूनदेखील साहित्य क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा घडून येते. या चर्चांमधून समाजाला एकप्रकारे विधायक दिशा मिळू शकते.