सरस्वतीच्या प्रांगणातील संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:14 AM2021-01-23T04:14:18+5:302021-01-23T04:14:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : नाशिक ही एकाहून एक ज्येष्ठ साहित्यिकांची भूमी असून दीड दशकानंतर नाशिकला होणारे हे साहित्य ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : नाशिक ही एकाहून एक ज्येष्ठ साहित्यिकांची भूमी असून दीड दशकानंतर नाशिकला होणारे हे साहित्य संमेलन सरस्वतीच्या प्रांगणातच होत असल्याने ते निश्चितपणे यशस्वी होईल, असा विश्वास महापौर सतीश कुलकर्णी यांनी व्यक्त केला. त्याआधी महापौरांच्या हस्ते गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कॅम्पसमध्ये होणाऱ्या यंदाच्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारी कार्यालयाचे उद्घाटन महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.
गोएसो कॅम्पसमधील फार्मसी कॉलेज इमारतीत या कार्यालयाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, विलास शिंदे, सतीश सोनवणे, लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, विश्वस्त हेमंत टकले, सुभाष पाटील, मुकुंद कुलकर्णी, लक्ष्मण सावजी, विनायक रानडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना महापौरांनी वाचाल तर वाचाल, हा मंत्र प्रत्येकाने लक्षात ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले. नाशिकच्या साहित्य रसिकांसाठी ही पर्वणी असल्याचेही महापौर कुलकर्णी यांनी नमूद केले. यावेळी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी महापालिका तसेच वैयक्तिक स्तरावरदेखील कार्य करण्यास तत्पर राहणार असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना हेमंत टकले यांनी हे संमेलन कुसुमाग्रजांच्या गावी होत असल्याने त्यात सर्व नाशिककर आपलेपणाने सहभागी होतील, असा विश्वास व्यक्त केला. हे गावाचे कार्य असल्याने सर्व जण आपापले राजकीय जोडे बाहेर ठेवून घरचे कार्य म्हणून तत्पर राहतील, असा विश्वास व्यक्त केला. प्रास्ताविक जयप्रकाश जातेगावकर यांनी तर सूत्रसंचालन मुकुंद कुलकर्णी यांनी केले.
इन्फो
फोन खणखणू लागले
साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन करून महापौरांसह सर्व पदाधिकारी कार्यालयातील हॉलमध्ये स्थानापन्न झाल्यावर भाषणांना प्रारंभ झाला. त्याच क्षणी मनपाला आग लागल्याच्या वार्तेचे फोन महापौर, विरोधी पक्षनेते, गटनेते अशा सगळ्यांच्या फोनवर खणखणू लागले. त्यामुळे भाषणे सुरू व्हायच्या आधीच आगीची वार्ता कानी पडल्याने प्रत्येक पदाधिकाऱ्याने भाषण आवरते घेत महापालिकेकडे रवाना झाले.