बैठक तहकूब; ४ जानेवारीच्या निकालानंतरच घेणार निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:14 AM2020-12-22T04:14:14+5:302020-12-22T04:14:14+5:30
नाशिक : पुढील वर्षीच्या साहित्य संमेलनासाठी प्रस्ताव देण्याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यासाठी बोलावण्यात आलेली सावाना कार्यकारी मंडळाची बैठक सोमवारी ...
नाशिक : पुढील वर्षीच्या साहित्य संमेलनासाठी प्रस्ताव देण्याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यासाठी बोलावण्यात आलेली सावाना कार्यकारी मंडळाची बैठक सोमवारी (दि. २१) तहकूब करण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावानाच्या बैठका तहकूब होण्याची परंपरा सोमवारीदेखील कायम राहिली. अध्यक्षांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे कार्याध्यक्ष वसंत खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार होती. मात्र, सावानाच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांना परस्परांविरोधात केलेल्या तक्रारींची सुनावणी ४ जानेवारीला धर्मादाय आयुक्तांकडे होणार आहे. त्या सुनावणीत काय निर्णय होणार ते पाहून मगच साहित्य संमेलनाबाबतचा निर्णय घ्यावा, असे ठरल्याने बैठक तहकूब करण्यात आली. ४ जानेवारीच्या बैठकीत जर निर्णय विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या विरोधात गेला तर साहित्य संमेलनाची जबाबदारी कुणी शिरावर घ्यायची, हा पेच उभा राहणार आहे. त्यामुळे विद्यमान पदाधिकाऱ्यांनी ही बैठक ४ जानेवारीचा निकाल काय लागतो, ते बघून मगच घेण्याचा निर्णय घेतल्याने बैठकच तहकूब करण्यात आली. अधिकृतरित्या बैठक तहकुबीनंतर झालेल्या चर्चेत सावाना साहित्य संमेलन घेण्यास सक्षम असले तरी धर्मादाय आयुक्तांच्या निकालानंतरच त्यावर निर्णय घेण्याबाबत उपस्थित कार्यकारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे आणि सदस्यांचे एकमत झाले.