संमेलनाध्यक्षांविनाच होणार संमेलन! डॉ. जयंत नारळीकर हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे अनुपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 09:57 AM2021-12-03T09:57:38+5:302021-12-03T09:57:46+5:30
Marathi Sahitya Sammelan: नाशिकमध्ये आजपासून सुरू होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष आणि ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. जयंत नारळीकर हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे संमेलनाला उपस्थित राहू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नाशिकचे संमेलन संमेलनाध्यक्षाविनाच आयोजकांना पार पाडावे लागणार आहे.
नाशिक : नाशिकमध्ये आजपासून सुरू होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष आणि ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. जयंत नारळीकर हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे संमेलनाला उपस्थित राहू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नाशिकचे संमेलन संमेलनाध्यक्षाविनाच आयोजकांना पार पाडावे लागणार आहे.
नाशिकला होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी प्रथमच विज्ञान साहित्यिक डॉ. नारळीकर यांची निवड करण्यात आली होती. त्यामुळे ९३ वर्षांत जे घडले नव्हते, ते ९४ व्या वर्षी नाशिकच्या संमेलनात घडणार होते. संमेलनाध्यक्ष म्हणून डॉ. नारळीकर हे पहिलेच वैज्ञानिक आणि विज्ञानकथा लेखक नाशिकच्या संमेलनास संबोधित करणार असल्याने विज्ञानप्रेमी नाशिककर आणि राज्यभरातील मराठी जनांना त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या संमेलनाची उत्सुकता लागलेली होती.
मात्र, पार्किन्सन या विस्मृतीशी निगडित आजारामुळे तसेच अन्य शारीरिक व्याधींमुळे मराठी साहित्य संमेलनाला उपस्थित राहता येणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गुरुवारी सायंकाळी डॉ. नारळीकर यांच्या सुविद्य पत्नी मंगला खाडीलकर यांनी ते संमेलनाला उपस्थित राहू शकणार नसल्याचे स्पष्ट केले. संमेलनाला जाण्याइतपत त्यांची प्रकृती स्वस्थ नसल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, संमेलनाध्यक्ष येणार नसले तरी त्यांच्या अध्यक्षीय भाषणाच्या प्रतीचे वाचन मंगला खाडीलकर या करणार असल्याचे सूत्रांकडून समजते.