संमेलनात उत्तर महाराष्ट्राच्या साहित्याचे प्रतिबिंब उमटेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:13 AM2021-01-22T04:13:55+5:302021-01-22T04:13:55+5:30
साहित्याचे प्रतिबिंब उमटणार लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : नाशिकमध्ये होणाऱ्या ९४ व्या मराठी साहित्य संमेलनामध्ये उत्तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ-श्रेष्ठ साहित्यिकांच्या ...
साहित्याचे प्रतिबिंब उमटणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : नाशिकमध्ये होणाऱ्या ९४ व्या मराठी साहित्य संमेलनामध्ये उत्तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ-श्रेष्ठ साहित्यिकांच्या योगदानाचे आणि त्यांच्या साहित्याचे प्रतिबिंब उमटेल, अशीच त्याची मांडणी करण्याचा प्रयास आयोजकांच्यावतीने केला जाणार आहे. पहिल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि निफाडचे भूमिपुत्र न्या. महादेव गोविंद रानडे ते प्रख्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी आणि स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर ते कविश्रेष्ठ कुसुमाग्रज आणि लक्ष्मीबाई टिळक ते वसंत कानेटकर अशा उत्तुंग साहित्यिकांच्या साहित्याचा रसास्वाद रसिकांना घेण्याची संधी संमेलनातून मिळणार आहे.
साहित्य संमेलनाच्या नियोजनाला नाशिकमध्ये वेग देण्यात आला आहे. संमेलनात कोणत्या विषयांवर परिसंवाद व्हावेत, कोणत्या विषयांना प्राधान्य देण्यात यावे, संमेलनातून नव्या पिढीला कशी प्रेरणा देता येईल, नाशिकच्या संमेलनाने साहित्य क्षेत्राला कशी नवी दिशा देता येईल, या सर्व बाबींवर लोकमतचे निवासी संपादक किरण अग्रवाल यांच्यासह नाशिकमधील अन्य संपादकांच्या उपस्थितीत विचार विनिमय करण्यात आला. यावेळी लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त आणि साहित्यिक हेमंत टकले, अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, विश्वस्त दिलीप साळवेकर, सचिव सुभाष पाटील, संजय करंजकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. या संमेलनात उत्तर महाराष्ट्रातील साहित्यिकांसह या भागातील बोलीभाषेचा आस्वाददेखील थोड्या प्रमाणात तरी रसिकांना घेता यावा अशीच आखणी करण्यात येणार आहे. त्याशिवाय २७ फेब्रुवारीच्या कुसुमाग्रज जयंती अर्थात मराठी राजभाषा दिनापासूनच्या उपक्रमांमधूनच साहित्य संमेलनाचे ब्रॅन्डींग करण्यास प्रारंभ करण्याचा विचार असल्याचेही आयोजकांच्यावतीने सांगण्यात आले. तसेच लवकरच संमेलनाची वेबसाईट तयार करुन त्याव्दारे नागरिकांना माहिती देण्यासह त्यांच्याकडून काही चांगले सल्ले आल्यास त्यांचादेखील विचार करण्यात येणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. तसेच संमेलनाच्यावेळी लागणाऱ्या प्रकाशकांच्या स्टॉलबरोबरच संमेलनापूर्वी पहिलेच पुस्तक प्रसिद्ध झालेल्या साहित्यिकांना रसिकांशी थेट संवाद साधता येईल, अशी काही रचना करण्याबाबतच्या सल्ल्याचेदेखील आयोजकांनी स्वागत केले. तसेच संमेलनाच्या ठरावात जे वास्तवात शक्य होतील, असेच ठराव करण्याचादेखील मानस व्यक्त करण्यात आला. सर्व संपादकांनी यावेळी गोखले एज्युकेशन सोसायटीमधील साहित्य संमेलनाचा संपूर्ण परिसर तसेच तेथील नियोजनाची पाहणी करुन मौलिक सूचना केल्या.
इन्फो
निसर्गाच्या सानिध्यात रंगणार कविसंमेलन
यंदाच्या साहित्य संमेलनात नवसाहित्यिकांसह ब्लॉगर्सनादेखील स्थान देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच सर्वाधिक वेगळेपण म्हणजे यावेळी रंगणारे कविसंमेलन हे निसर्गाच्याच सानिध्यात खुल्या रंगमंचावर साकारले जाणार आहे. त्यामुळे साहित्य संमेलनात निसर्गाच्या सानिध्यात होणाऱ्या या कविसंमेलनाने एक अनोखी वातावरण निर्मिती करण्याचादेखील आयोजकांचा प्रयास राहणार आहे.