कॉँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या मुलाखती एका दिवसात पूर्ण
By admin | Published: January 24, 2017 01:03 AM2017-01-24T01:03:20+5:302017-01-24T01:03:56+5:30
निवडणूक : २७ जानेवारीला पहिली यादी जाहीर होणार
नाशिक : काही प्रभागात इच्छुकांची संख्या अधिक तर काही ठिकाणी उमेदवार नाही, अशा परिस्थितीत महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. एकीकडे राष्ट्रवादीशी आघाडी करण्याची चर्चा सुरू असून, तो घोळ मिटत नसल्याने कॉँग्रेसने इच्छुकांच्या माध्यमातून चाचपणी केली आहे. मंगळवारी (दि.२४) छाननी समितीची बैठक झाल्यानंतर नावे राज्य निवड मंडळाकडे पाठविण्यात येणार असून, २७ जानेवारीस रात्री उशिरा नावे घोषित होण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी कॉँग्रेसने दिवसभरात सर्व मुलाखती पूर्ण केल्या. सायंकाळपर्यंत ८६ इच्छुकांच्या मुलाखती झाल्या होत्या. त्यानंतर ६० अर्ज अद्यापही बाकी असले तरी रात्रीपर्यंत अडीचशे मुलाखती घेण्यात येणार असल्याचे कॉँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले. कॉँग्रेस भवन येथे मुलाखतीसाठी गर्दी झाली होती. कॉँग्रेसचे सहायक प्रभारी अविनाश रामेष्टी, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, माजी आमदार जयप्रकाश छाजेड, कॉँग्रेस शहराध्यक्ष शरद अहेर, प्रवक्ता डॉ. हेमलता पाटील, शाहू खैरे, राहुल दिवे, शैलेश कुटे, गुलाम शेख, वसंत ठाकूर, वसंत आव्हाड, उद्धव पवार, बबलू खैरे यांच्यासह सर्व आघाड्यांचे अध्यक्ष आणि ब्लॉक अध्यक्षांच्या उपस्थितीत या मुलाखती घेण्यात आल्या. कॉँग्रेस पक्ष सोडून गेलेले काही नगरसेवक वगळले तर कॉँग्रेस पक्षाच्या सर्वच विद्यमान नगरसेवकांनी मुलाखती दिल्या, एवढेच नव्हे तर कॉँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक बबलू पठाण यांनीही मुलाखत दिली. या मुलाखतीनंतर कॉँग्रेस छाननी समितीची बैठक मंगळवारी (दि.२४) होणार असून, यावेळी बहुतांशी यादीला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. यासंदर्भातील अहवाल कॉँग्रेस पक्षाच्या श्रेष्ठींना देण्यात येणार आहे. २७ जानेवारीस कॉँग्रेस
पक्षाच्या राज्य निवड मंडळाची बैठक होणार आहे. त्यात उमेदवार निश्चित झाल्यानंतर रात्री यादी घोषित होण्याची शक्यता असल्याचे शहराध्यक्ष शरद अहेर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)