महिला बालकल्याण समिती सभेत सदस्य आक्रमक
By admin | Published: January 15, 2015 12:10 AM2015-01-15T00:10:28+5:302015-01-15T00:10:39+5:30
विचारला जाब : कामे होत नसल्याची तक्रार
नाशिक : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीची सभा होऊन सर्व महिला सदस्यांनी कामे होत नसल्याची तक्रार करत प्रशासनाला जाब विचारला. कामे होत नसतील तर सामूहिक राजीनामे देत समिती बरखास्त करण्याचा इशाराही सदस्यांनी दिला. दरम्यान, समितीमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध प्रशिक्षण उपक्रमांबाबतही जोरदार चर्चा झाली.
महिला व बालकल्याण समितीची सभा सभापती रंजना बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. नियोजित वेळेत उपआयुक्त गोतिसे हजर न राहिल्याने विलंबाने सुरू झालेल्या सभेच्या प्रारंभीच महिला सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. गेल्या तीन महिन्यांपासून कामे रखडली असल्याची तक्रार करतानाच, वंचित बालकांच्या मेळाव्यासंबंधीची फाईलही टेबलांवर फिरत असल्याचे सभापतींनी निदर्शनास आणून दिले. त्याचबरोबर समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण उपक्रमासंबंधी सदर ठेकेदाराच्या कार्यपद्धतीबद्दलही रोष व्यक्त करण्यात आला. दरम्यान, महिला व बालकल्याण समितीचा पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बंगळुरू महापालिकेचा अभ्यास दौरा करण्यासाठी पाच लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यासंबंधीचे पत्र ठेवण्यात आले. कराटे प्रशिक्षण वर्ग येत्या २६ जानेवारीपासून सुरू करण्यास संमती देण्यात आली. बैठकीत सदस्यांनी मांडलेल्या विषयांना मंजुरी देण्यात आली. त्यात हळदीकुंकू कार्यक्रम राबविणे, अंगणवाडीसाठी साहित्य खरेदी, अंगणवाडीतील सुमारे साडेतेरा हजार बालकांना गणवेश व ओळखपत्र देणे, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना ड्रेसकोड लागू करणे आदि विषयांना मंजुरी देण्यात आली. (प्रतिनिधी)