‘शिवदुर्ग’च्या सदस्यांनी केली गोरखगडावर स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 06:02 PM2021-03-12T18:02:05+5:302021-03-12T18:02:39+5:30
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील शिवदुर्ग संवर्धन व भ्रमंती या संस्थेच्या सदस्यांनी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील गोरखगड या नाथपंथातील गोरक्षनाथ यांचे वास्तव्य लाभलेल्या किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवून मुख्य दरवाजाजवळील परिसर व किल्ल्यावरील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ केल्या.
गोरखगडाच्या कातळात खोदलेल्या प्रवेशव्दारातून वर चढून गेल्यावर गुहेच्या आजुबाजुला पाण्याची तीन टाकी आहेत. या पठारावर एकूण चौदा पाण्याची टाके आहेत. पण, त्यापैकी गुहेजवळील पाण्याच्या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. याच पाण्याच्या टाक्या शिवदुर्ग संवर्धन भ्रमंती संस्थेच्या सदस्यांनी स्वच्छ केल्या. त्यात पडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या बाहेर काढून स्वच्छता करण्यात आली. किल्ल्यावरील महादेवाच्या मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. जमा झालेला कचरा किल्ल्यावरील एका मोठ्या खड्ड्यात टाकून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली.
या मोहिमेमध्ये श्याम गव्हाणे, बाळासाहेब शिंदे, विजय दराणे, छोटू दराणे, पालघर शाखेचे अमित पाटील, धीरज पाटील, संतोष इंगळे, नयन भोईर, मयुर मडवी, आशिष सावंत, किरण ठाकरे, दर्शन पाटील, विशाल जाधव, चेतन पाटील, प्रतीक जाधव, प्रशांत भोईर, संकेत पाटील, रमेश धस, तुषार हिंदुराव आदी सदस्य सहभागी झाले होते.
गोरखगड हा मुरबाड येथील देहरी गावाजवळचा किल्ला आहे. नाथ संप्रदायातील गोरक्षनाथांच्या साधनेचे हे ठिकाण आहे. त्यामुळे त्यांच्या नावावरून या किल्ल्याचे नाव गोरखगड असे ठेवलेले आहे. गोरखगड आणि मच्छिंद्रगड हे त्यांच्या सुळक्यामुळे गिर्यारोहकांसाठी नेहमीच आकर्षण ठरले आहेत. या गडाचा उपयोग केवळ आसपासच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी होत असे. पूर्वी नाणेघाटमार्गे जुन्नरला जाताना या गडाचा निवासस्थान म्हणून वापर होत असे. मर्यादित विस्तार असूनही मुबलक पाणी गडावर उपलब्ध आहे.