गोरठाण ग्रामपंचायतीच्या सात सदस्यांचे सदस्यत्व रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 06:24 PM2021-07-31T18:24:00+5:302021-07-31T18:24:22+5:30
पिंपळगाव बसवंत : ग्रामपंचायत निवडणुकीतील खर्च सादर न करणे गोरठाण येथील ग्रामपंचायतीच्या सात सदस्यांना चांगलेच महागात पडले असून जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निकालात सात जणांचे ग्रामपंचायत सदस्य पद रद्द झाले असून पुढील पाच वर्ष त्यांना कोणतीही निवडणूक लढवता येणार नसल्याचा देखील दंड दिला आहे.
पिंपळगाव बसवंत : ग्रामपंचायत निवडणुकीतील खर्च सादर न करणे गोरठाण येथील ग्रामपंचायतीच्या सात सदस्यांना चांगलेच महागात पडले असून जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निकालात सात जणांचे ग्रामपंचायत सदस्य पद रद्द झाले असून पुढील पाच वर्ष त्यांना कोणतीही निवडणूक लढवता येणार नसल्याचा देखील दंड दिला आहे.
डिसेंबर २०२१ मध्ये पिंपळगाव बाजार समितीचे माजी संचालक माधवराव ढोमसे यांच्या नेतृत्वाखाली विकास पॅनलने थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत सात जागा जिंकून विरोधी आदर्श पॅनलची धोबीपछाड करत विजयाचा धुराळा उडवला. मात्र विजयाच्या धुंदीत उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनीकडे निवडणुकीचा कोणताच खर्च सादर केला नाही. हेच हेरून विरोधी आदर्श पॅनलचे नेते अशोक ढोमसे यांनी संबंधित प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यावर दीड वर्ष सुनावणी चालली अखेर जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी ज्ञानेश्वर सदाशिव केदारे , ज्योती गोकुळ वाघ, विजय म्हसू बर्डे , रंजना संजय पवार , अनुसया भाऊलाल हांडे , सीमा नवनाथ ढोमसे, दौलत वाळुंबा ढोमसे या ग्रामपंचायत सदस्यांनी खर्च सादर न करून नियमांचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट केले व त्यांची ग्रामपंचायत सदस्य पदे रद्द ठरवली आणि पुढील पाच वर्ष त्यांना कोणतीही निवडणूक लढवता येणार नसल्याचा देखील दंड केला आहे.
राजकीय उलथापालथ होण्याची शक्यात
निफाड तालुक्यात प्रथमच एका ग्रामपंचायतचे मोठ्या प्रमाणात सदस्यत्त्व पद रद्द होण्याची ही पहिलीच घटना असून या निकालामुळे गोरठाण ग्रामपंचायतीच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची संकेत निर्माण झाले आहे . या निकालाच्या प्रति जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी तहसील कार्यालय निफाड, गट विकास अधिकारी, पंचायत समिती निफाड आणि गोरठाण ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे माहितीसाठी पाठवले आहेत.
धन शक्तीचा वापर करून ग्रामविकास पॅनेलने अनैतिक मार्गाने निवडणूक जिंकली होती, म्हणूनच त्यांचे पदे गेले. आता आगामी निवडणुकीत गोरठाण गावाच्या विकासाचा मुद्दा घेऊन जनतेच्या समोर जाणार आहे.
- अशोक ढोमसे, आदर्श पॅनल, गोरठाण.
जनतेने दिलेला कौल नाकारण्याचा प्रकार झाला असून या निर्णयाविरोधात थेट न्यायालयात दाद मागणार आहेत. निवडणूक झाली तरी गोरठाण गावची जनता आमच्या पाठीशी उभी आहे.
- माधवराव ढोमसे, ग्राम विकास पॅनल.