कर्तव्यपूर्तीसोबत स्मरणीय ठरलेला सेवाभाव महत्त्वाचा!
By किरण अग्रवाल | Published: May 3, 2020 01:46 AM2020-05-03T01:46:34+5:302020-05-03T01:58:06+5:30
‘कोरोना’च्या संकट काळात शासकीय-प्रशासकीय यंत्रणा पूर्ण क्षमतेने परिश्रम घेत असली तरी, कसल्यातरी उणिवेची चर्चाही घडून येतेच; परंतु अशात स्थलांतरितांची काळजी घेताना त्यांना ज्या ममत्वभावाने रवाना करण्यात आले ते पाहता, यंत्रणेमधील माणुसकी धर्माचा प्रत्यय आला आहे.
सारांश
किरण अग्रवाल।
संकटात किंवा अडी-अडचणीच्या काळात जवळचे म्हणविणाऱ्या आपल्यांची परीक्षा होते असे म्हणतात, पण ‘कोरोना’च्या संकट काळात आपलेही चार हात लांबच राहिलेले असताना, परके मात्र माणुसकी धर्माचा जागर घडवताना आढळून येतात तेव्हा डोळ्यातून ओघळणाºया अश्रूंतून सुहृदयी संवेदनांचा गहिवर प्रदर्शित झाल्याखेरीज राहात नाही. लॉकडाउनदरम्यान नाशकात अडकलेल्यांची खास रेल्वेद्वारे त्यांच्या त्यांच्या गावी रवानगी करण्यात येत असतानाही त्याचाच प्रत्यय घडून येणे त्यामुळेच स्वाभाविक ठरले.
‘कोरोना’ला रोखण्यासाठी देशात लॉकडाउन पुकारला गेल्यानंतर हातावर पोट असणाºया कामगार-मजुरांची मोठी अडचण झाली. त्यामुळे उत्तर प्रदेश, बिहारमधले कामगार शेकडो मैल पायी चालत जाण्याची तयारी करून मुंबईतून बाहेर पडले. यात पायी चालण्याच्या श्रमातून होणाºया प्रकृतीच्या त्रासाचा जास्त धोका आहे, तसाच कोरोनाच्या संक्रमणाचाही. त्यामुळे असे काही लोंढे वा जत्थे जेव्हा कसारा घाट पार करून इगतपुरी-घोटीपर्यंत येऊन पोहोचले तेव्हा स्थानिकांमधील सुरक्षेची चिंता वाढून गेली. शिवाय, हे जत्थे नाशिकमधून जाणार असल्याने धोक्याला निमंत्रण म्हणून त्यांच्याकडे पाहिले गेले. अखेर या साऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांची व्यवस्था करणे जिल्हा प्रशासनाला भाग पडले.
मार्च महिन्याच्या अखेरीस २३ तारखेला लॉकडाउन सुरू झाल्यानंतर हळूहळू हे लोक मुंबईबाहेर पडू लागले होते. त्यामुळे त्यांना नाशिकच्या वेशीबाहेरच ताब्यात घेतले गेले असतांना नाशकातील मजुरांचेही हाल होऊ लागल्याने त्यांच्याही व्यवस्थेची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर येऊन पडली. त्यासाठी नाशकातील शाळा व अन्य ठिकाणे अधिग्रहित करून सुमारे दोनेक हजार स्थलांतरितांची अस्थायी निवारागृहात व्यवस्था करण्यात आली. त्यांच्यात ‘फिजिकल डिस्टन्स’ राखतानाच त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्थाही केली गेली. इतकेच नव्हे तर काही निवारागृहात काहींचे वाढदिवसही साजरे करून त्यांना कौटुंबिक ममत्वाचा आधार देण्यात आला. त्यासाठी शहरातील सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेत संबंधितांच्या जेवणाची सोय केली. स्वत:च्या जिवाची चिंता लागून राहिलेली असताना अशी अनोळखींसाठी व्यवस्था होणे, आरोग्य तपासणीसह अन्य बाबींची काळजी घेतली जाणे हे विशेष ठरावे. यातील कुणाचा-कुणाला परिचय नाही, संकटाने सोबतीला आणलेले सारे प्रवासी. पण ते एकमेकांची काळजी घेत आहेत, नाशिककरही; म्हणजे यात प्रशासकीय यंत्रणेसह सामाजिक सेवाभावीही या निर्वासितांची काळजी घेत आहेत. म्हणूनच, यातील काहींना गेल्या दोन दिवसांत जेव्हा विशेष रेल्वेने त्यांच्या राज्यात-गावी पाठविण्यात आले तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्यात कृतज्ञभावाचे अश्रू तरळलेले दिसून आले.
नाशकातून मध्य प्रदेश तसेच उत्तर प्रदेशात विशेष रेल्वे सोडून या स्थलांतरितांची घरवापसी करण्यात येत आहे. ती करतानाही त्यांना प्रवासात पुरेल अशी अन्नाची पाकिटे, तोंडाला बांधण्यासाठी मास्क, हात धुण्यासाठी सॅनिटायझर्स आदी वस्तू सोबत दिल्या जात आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आदींनी स्वत: रेल्वे फलाटावर उपस्थित राहून आपल्या निगराणीखाली या लोकांना रवाना केले. योगायोग असा की, महाराष्ट्राचा हीरकमहोत्सव व कामगार दिन साजरा होत असताना हे घडून येत होते. म्हणजे परतावणीच्या कामगारांची काळजी घेतली जाताना महाराष्ट्राच्या संस्कार-संस्कृतीचे परोपकारी दर्शन यातून घडून आले. ‘कोरोना’चे संकट दूर झाल्यावर हेच कामगार जेव्हा पुन्हा इकडे येतील तेव्हा त्यांच्या मनात कायमसाठी जपल्या गेलेल्या येथील यंत्रणेच्या कर्तव्यपूर्तीसोबतच्या सेवाभावाच्या आठवणी असतील, ज्यातून पुन्हा बलशाली व उन्नत महाराष्ट्र उभा राहायला मदतच घडून येईल. महत्त्वाचे म्हणजे, नाशकात अडकलेल्यांना जसे त्यांच्या गावी पाठविण्यात येत आहे, तसे राजस्थानच्या कोटा येथे शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी तेथे अडकून पडले होते. त्यांनाही विशेष बसद्वारे नाशकात आणण्यात आले, त्यावेळी त्यांच्या नातेवाइकांच्या डोळ्यात तरळलेले अश्रूही खूप काही सांगून गेलेत. कोटा येथील यंत्रणेने त्यांची तेथे घेतलेली काळजीसुद्धा माणुसकी धर्माची पताका सर्वत्र फडकत असल्याची जाणीव करून देणारी आहे. आजच्या संकट काळात हाच सेवाधर्म जोपासणे गरजेचे आहे.