सावरकरांच्या उद्यानरूपी स्मारकाला आली अवकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 01:29 AM2018-02-26T01:29:07+5:302018-02-26T01:29:07+5:30
सशस्त्रक्रांतीचे पुरस्कर्ते आणि जाज्वल्य देशाभिमान असणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे उद्यानरूपी स्मारक साकारल्यानंतर भगूरकरांना झालेला आनंद क्षणिक ठरला.
विलास भालेराव ।
भगूर : सशस्त्रक्रांतीचे पुरस्कर्ते आणि जाज्वल्य देशाभिमान असणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे उद्यानरूपी स्मारक साकारल्यानंतर भगूरकरांना झालेला आनंद क्षणिक ठरला. कालांतराने गावालगत दारणाकाठी असलेल्या या स्मारकाला अवकळा आली असून, भिकाºयांचे ते आश्रयस्थान बनले आहे. सावरकरांचे नाव घेऊन कारभार करणाºया सर्वच पक्षांच्या नेत्यांना त्यांचे विस्मरण होत असून, राज्य सरकारकडून निधी आल्यानंतरच स्मारकाचे काम मार्गी लागेल, असे सांगून कारभारी हात वर करीत आहेत. भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आत्मसमर्पण दिन सोमवारी (दि.२६) असून, त्यानिमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा देणारे भगूरकर उद्यानाच्या अवस्थेमुळे अस्वस्थ होतात. भगूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वाडा असून, त्या जवळ दारणा नदीकाठी निसर्गरम्य असे हे उद्यान १९७७-७८ मध्ये साकारण्यात आले होते. त्यावेळी पां. भा. करंजकर हे नगराध्यक्ष होते. नाशिक नगरपालिकेतील अधिकारी विशेषत: मधुकर झेंडे यांच्या सारख्या अधिकाºयाची मदत घेऊन उद्यानात आकर्षक झाडे लावण्यात आली होती. त्याचप्रमाणे ज्येष्ठ विचारवंत शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते या उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्याकाळी भगूरकरच नव्हे तर अनेकांना या उद्यानाच्या आठवणी स्मरतात. परंतु कालांतराने या उद्यानाकडे दुर्लक्ष होत गेले आणि ते लयास जाऊ लागले. त्यासाठी मध्यंतरी नवीन आराखडा तयार करण्यात आला. परंतु खर्चाचे नियोजन नसल्याने उद्यानाचे नूतनीकरण पूर्ण होऊ शकले नाही. दरवेळी भगूर नगरपालिकेच्या निवडणुका आल्यानंतर या उद्यानाचा मुद्दा उपस्थित केला जातो आणि निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर हा मुद्दा विस्मरणात जातो. वर्षभरापूर्वी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळीदेखील स्थानिक नेत्यांनी सत्ता आल्यास सहा महिन्यांत उद्यानाचे काम सुरू झालेले दिसेल, असा शब्द दिला होता. मात्र, वर्ष उलटले तरी हालचाल नाही, उलट राज्य सरकारकडून निधी आला की काम सुरू होईल, असे सांगून हात वर केले जात आहे. उद्यानाची सद्यस्थिती गंभीर असून या जागेत अनेक भिकारी राहात आहेत. उद्यानात शोभिवंत झाडांऐवजी गाजर गवत वाढले आहे. अत्यंत अस्वच्छ असा हा परिसर असून एकेकाळी वर्दळ असलेल्या या उद्यानाकडे जाण्यासही भगूरकर धजावत नाहीत. ही स्थिती बदलावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.