‘बिरोबाच्या ठाण्या’त जागविल्या वीरपुत्र सचिन यांच्या आठवणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 11:10 PM2020-06-26T23:10:50+5:302020-06-27T01:35:54+5:30
मला फोन करू नका, मी रेंजमध्ये नाही, असे सुमारे महिनाभरापूर्वी व भ्रमणध्वनी-वरून बोलणे झालेल्या येथील सचिन मोरे यांना वीरमरण आले अन् ‘रेंज’ नसल्याने महिनाभरापूर्वीचा ‘संवाद’ केवळ आठवण म्हणून ठेवून गेला. संपूर्ण मोरे वस्तीवर आज दिवसभर गाव गोळा झाला. कुटुंबीयांसह गावकऱ्यांनी वीरपुत्राच्या आठवणी जागवित आपल्या भावनांना वाट करून दिली. आता वीरपुत्राच्या अंतिम दर्शनासाठी सर्वांचे डोळे त्याच्या कलेवराच्या आगमनाकडे लागले आहेत.
शफिक शेख ।
साकुरी झाप, ता. मालेगाव : मला फोन करू नका, मी रेंजमध्ये नाही, असे सुमारे महिनाभरापूर्वी व भ्रमणध्वनी-वरून बोलणे झालेल्या येथील सचिन मोरे यांना वीरमरण आले अन् ‘रेंज’ नसल्याने महिनाभरापूर्वीचा ‘संवाद’ केवळ आठवण म्हणून ठेवून गेला. संपूर्ण मोरे वस्तीवर आज दिवसभर गाव गोळा झाला. कुटुंबीयांसह गावकऱ्यांनी वीरपुत्राच्या आठवणी जागवित आपल्या भावनांना वाट करून दिली. आता वीरपुत्राच्या अंतिम दर्शनासाठी सर्वांचे डोळे त्याच्या कलेवराच्या आगमनाकडे लागले आहेत.
वीर जवान सचिन मोरे जानेवारी महिन्यात साकुरी झाप येथे आपल्या गावी सुटीत आले होते. महिनाभर घरी आई-वडील, भावंड, पत्नी, मुले यांचा सहवास अखेरचाच ठरला. लडाखला बदली झाली आहे. तेथे ‘रेंज’ची समस्या आहे. मला फोन करू नका, ‘रेंज’ मिळणार नाही, असे सांगितल्याचे त्याचे वडील विक्रम मोरे यांनी सांगितले.
मालेगाव तालुक्याच्या सीमेवरील शेवटचे गाव आणि ‘बिरोबा’चे ठाणे म्हणून प्रसिद्ध असलेल्या साकुरी झाप गावात मोरे वस्ती आहे. वस्तीत शेतात बांधलेल्या घरालगत आज दिवसभर तालुका भरातील लोकांची ‘रिघ’ लागली होती. शेतातच छोटा मंडप टाकून सांत्वनासाठी आलेल्या लोकांना सचिनचे वडील विक्रम मोरे भेटत आहेत.
देशासाठी मुलगा शहीद झाल्याचा अभिमान तर आहेच; पण आज वीर-जवानाच्या दर्शनासाठी झालेल्या गर्दीमुळे ‘ऊर’ आणखी दाटून आल्याचे विक्रम मोरे यांनी सांगितले.
वीरजवान मोरे यांची पत्नी सारिका माहेरी वाजगाव खर्डे येथे राहत होत्या. मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून त्यांनी तेथून जवळच असलेल्या भाबडबारीनजीक शाळेत टाकले आहे. बुधवारी रात्रीच त्यांच्या मोबाइलवर सचिनला ‘वीरगती’ प्राप्त झाल्याचे कळविण्यात आले होते. मात्र पत्नी सारिका यांना सकाळी साडेआठ ते नऊ वाजेदरम्यान माहेरच्या घरातील लोकांनी हा निरोप दिला. त्यानंतर सासरी साकुरी झाप येथे सासरच्या लोकांना ही माहिती कळविण्यात आली. दोन मुली आणि लहान कार्तिकला घेऊन पत्नी सारिका या सासरी आल्या आणि एकच हंबरडा फोडला. अनावर झालेल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.