पोलीस स्मृतीदिनानिमित्त शहीद भाबड यांच्या स्मृतींना उजाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 05:45 PM2018-10-21T17:45:07+5:302018-10-21T17:45:21+5:30
सिन्नर : देशभरात कोणताही राष्टÑीय सण असो तसेच गणेश उत्सव, दसरा, दिवाळी अशा सर्वच सणांमध्ये सीमेवरील जवान व पोलीस कर्मचारी सदैव नागरिकांच्या सुरक्षेकरीता तैनात असतात.
सिन्नर : देशभरात कोणताही राष्टÑीय सण असो तसेच गणेश उत्सव, दसरा, दिवाळी अशा सर्वच सणांमध्ये सीमेवरील जवान व पोलीस कर्मचारी सदैव नागरिकांच्या सुरक्षेकरीता तैनात असतात. कर्तव्यावर काम करत असताना अनेकांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागते. शहीदांचे बलिदान अमुल्य आहे. त्याचे मोजमाप होऊच शकत नाही असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीपकुमार बोरसे यांनी केले.
सिन्नर तालुक्यातील चास येथील भोजापूर खोरे हायस्कूल येथे झालेल्या शहीद दिन व पोलीस स्मृती कार्यक्रमात बोरसे बोलत होते. संपूर्ण देशभरात २१ आॅक्टोबर हा दिवस कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच शहीद जवानांचे स्मृतीपित्यर्थ पोलीस स्मृतीदिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने नाशिक जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी शहीद जवानाना आदरांजली अर्पित करण्यासाठी पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चास गावचे सुपूत्र शहीद सुरेश शंकर भाबड यांच्या कुटुंबीयांचा स्मृतीचिन्ह व भेटवस्तू देवून यावेळी सत्कार करण्यात आला. शहीदांचे बलिदान व त्यांचे कर्तव्य आणि त्यागाची माहिती शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांना मिळावी व त्यांच्या स्मृतीस उजाळा मिळावा यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांच्या वतीने सदरचा उपक्रम राबविण्यात आला. भाबड यांच्या पत्नी जया भाबड, मुले सार्थक व रेणुका, वडील शंकर गणपत भाबड, आई अंजनाबाई शंकर भाबड यांची भेट घेवून त्यांना स्मृतिचिन्ह व भेटवस्तू सहाय्यक पोलीस निरिक्षक बोरसे यांच्या हस्ते देण्यात आले. तालुक्यातील चास येथील मुळ रहिवासी असलेले पोलीस नाईक सुरेश भाबड हे अलिबाग जिल्ह्यात खोपोली पोलीस ठाण्यात कार्यरत असताना महामार्गावर लुटमार करणाऱ्या टोळीस अटकाव करताना त्यांच्या अंगावर गुन्हेगारांनी टाटा टेम्पो वाहन घातले. या घटनेत जखमी होवून त्यांचे निधन झाले होते.