शंकराचार्य जयेंद्र सरस्वतींच्या स्मृतींना उजाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 01:42 AM2018-03-01T01:42:01+5:302018-03-01T01:42:01+5:30
श्री कांची कामकोटी पीठाधिपती जगद्गुरू शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती यांचा पुण्यभूमी नाशिकवर विशेष स्नेह होता. कुंभमेळ्यातच नव्हे तर अनेकदा त्यांनी येथे हजेरी लावली होती. शिवाय येथील महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानच्या वेद पाठशाळेशी त्यांचे ऋणानुबंध होते. या पाठशाळेतील विद्यार्थ्यांची दरवर्षी भेट घेऊन ते त्यांना मार्गदर्शन करीत. जयेंद्र सरस्वती यांच्या निधनामुळे अनेक घटनांना उजाळा मिळाला.
नाशिक : श्री कांची कामकोटी पीठाधिपती जगद्गुरू शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती यांचा पुण्यभूमी नाशिकवर विशेष स्नेह होता. कुंभमेळ्यातच नव्हे तर अनेकदा त्यांनी येथे हजेरी लावली होती. शिवाय येथील महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानच्या वेद पाठशाळेशी त्यांचे ऋणानुबंध होते. या पाठशाळेतील विद्यार्थ्यांची दरवर्षी भेट घेऊन ते त्यांना मार्गदर्शन करीत. जयेंद्र सरस्वती यांच्या निधनामुळे अनेक घटनांना उजाळा मिळाला. नाशिकमध्ये अनेक पीठांचे शंकराचार्य येऊन गेले. त्याचप्रमाणे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांनी नाशिकला अनेकदा भेट दिली. कुंभमेळ्यादरम्यान आलेल्या शंकराचार्यांनी नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे भेट दिली. तसेच त्र्यंबकेश्वर येथे वास्तव्य केले होते. तत्पूर्वी ते अनेकदा नाशिकला येऊन गेले होते. श्री काळाराम मंदिरालाही त्यांनी भेट दिल्याचे महंत सुधीरदास पुजारी यांनी सांगितले. चेन्नई येथे २०१५ मध्ये देखील विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांच्या समवेत त्यांची भेट झाल्याची आठवण पुजारी यांनी सांगितली. नाशिकच्या अनेक वेदसंस्थांशी त्यांचा संबंध होता. त्यात महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानच्या वेद पाठशाळेवर त्यांची विशेष कृपा होती. सध्या लाखलगाव शिवारात असलेल्या या वेद पाठशाळेला शंकराचार्यांचे विशेष पाठबळ होते. या वेद पाठशाळेचे विद्यार्थी कांची कामकोटी येथील आश्रमात जाऊन त्यांचे आशीर्वाद घेत. गेल्याच महिन्यात त्यांची भेट घेतल्याचे या वेद पाठशाळेचे संचालक वेदमूर्ती रवींद्र पैठणे गुरुजी यांनी सांगितले. रसाळ भाषेत मार्गदर्शन करणाºया शंकराचार्यांच्या हस्ते पैठणे गुरुजी लिखित नित्यब्रह्मो पासनसमुच्चय: या पुस्तकाचे प्रकाशन माटुंगा येथील श्री शंकर मठात करण्यात आले. वैदिक जीवनशैलीने सर्व हित साधावे असे आवाहन शंकराचार्यांनी यावेळी केले होते.
शंकराचार्य हे १९८०मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्षप्रतिपदेच्या उत्सवासाठी सध्याच्या पुणे विद्यार्थी गृहाच्या मैदानावर आले होते. त्यावेळी ‘चल चल बंधो संघस्थानम, कांक्षसी यदि निज राष्ट्रोत्थानम’ हे पद्य त्यांच्यासमोर सादर झाले होते, अशी आठवण रमेशराव गायधनी यांनी सांगितली.
नाशिकमध्ये प्रार्थना
नाशिकमधील महर्षी गौतम वेदविद्या प्रतिष्ठानच्या तपपूर्तीनिमित्ताने शंकराचार्यांनी संस्कृत भाषेत शुभेच्छा संदेश पाठविला होता. या पाठशाळेच्या वतीने शंकराचार्यांना सदगती प्राप्त व्हावी यासाठी इशावास्य उपनिषेदांचे पठण करून प्रार्थना करण्यात आली.