मेनरोड होणार मोकळा

By admin | Published: July 26, 2014 12:14 AM2014-07-26T00:14:26+5:302014-07-26T00:54:35+5:30

फेरीवाला धोरण : अन्यत्र होणार पुनर्वसन; नवीन मार्केट उभारणार

MENRoad will be free | मेनरोड होणार मोकळा

मेनरोड होणार मोकळा

Next

नाशिक : अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांनादेखील अडथळा ठरलेला मेनरोड येत्या वर्षभरात मोकळा श्वास घेण्याची शक्यता आहे. फेरीवाला धोरणाअंतर्गत येथील विक्रेत्यांना अन्यत्र स्थलांतरित करून त्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे गंगाघाटावरील भाजीबाजारही स्थलांतरित करण्यासाठी पालिका प्रयत्न करीत आहे.
शहरात कुठेही व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांमुळे वाहतुकीस अडथळा आणि अपघात होत असतात. त्यामुळे पालिका संबंधित अतिक्रमणधारकांवर नेहमी कारवाई करीत असते. फेरीवाले त्यास विरोध करतात आणि पुनर्वसनाची मागणी करतात. फेरीवाला धोरणानुसार पुनर्वसन करणे बंधनकारक आहे. परंतु आठ मीटर रुंदीपेक्षा कमी रुंद असलेल्या रस्त्यावर व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेला मेनरोडवरील अतिक्रमणे हटविणे बंधनकारक आहे. फेरीवाला धोरणाअंतर्गत अशा प्रकारे वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या फेरीवाल्यांना अन्यत्र स्थलांतरित करण्याची तरतूद आहे. त्यामुळे भद्रकालीसारख्या ठिकाणी हे व्यावसायिक स्थलांतरित केले जाऊ शकतात. भद्रकालीत फळविक्रेते पालिकेच्या जागेत व्यवसाय करतात. परंतु दुसऱ्या लेनमधील अनेक छोटे गाळे बंद अवस्थेत असून, त्याचा अवैध कृत्यांसाठी वापर होतो. त्यामुळे ते टाळण्यासाठी याठिकाणी नवीन मार्केट उभारणीचा पालिकेचा विचार सुरू आहे. तसे झाल्यास मेनरोडवरील अनेक व्यावसायिकांना या जागेत स्थलांतरित केले जाण्याची शक्यता आहे.
मेनरोड हा विक्रेत्यांनी व्यापला असून, तेथे व्यापारी संकुलात व्यवसाय करणाऱ्यांनादेखील अडचण होते. हा रस्ता असूनही दुचाकी जाण्यासदेखील जागा नसते. तसेच पादचाऱ्यांना चालणेही कठीण होते. फेरीवाला धोरणाअंतर्गत या विक्रेत्यांचे पुनर्वसन झाल्यास हा त्रास वाचणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: MENRoad will be free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.