शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य महत्त्वाचे
By मुकेश चव्हाण | Published: April 24, 2020 11:12 PM2020-04-24T23:12:34+5:302020-04-24T23:42:12+5:30
नाशिक : कोरोनाच्या प्रादुर्भावाने माणसांच्या केवळ शारीरिक स्वास्थ्यावर परिणाम केला नाही तर मानसिक स्वास्थ्यावरदेखील मोठा दुष्परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
मुकुंद बाविस्कर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कोरोनाच्या प्रादुर्भावाने माणसांच्या केवळ शारीरिक स्वास्थ्यावर परिणाम केला नाही तर मानसिक स्वास्थ्यावरदेखील मोठा दुष्परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
गेल्या महिनाभरापासून घरात राहिल्याने मनावर वाढलेला ताण, चिडचिडेपणा, झोप न लागणे, सतत भीती वाटणे, कोणत्यातरी गोष्टीचा सतत फोबिया असणे असे प्रकार वाढले असून, त्यातून काही जणांच्या मनात टोकाचे पाऊल म्हणून आत्महत्येचे विचार येणे आणि दुर्दैवाने तशा काही घटनादेखील घडत आहेत.
सध्याच्या परिस्थितीचा सकारात्मक विचार करून आपले दैनंदिन जीवन विधायक कामात गुंतवून ठेवा कारण शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यही महत्त्वाचे असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञांनी दिला आहे. सध्या जो काही प्रवाह (वातावरण) आहे त्याच्याविरुद्ध जाऊन उपयोग नाही, तर प्रवाहाच्या बाजूने विचार करायला शिका, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
--------
अनिश्चिततेच्या काळात सर्वांनाच भीती आणि चिंता वाटते आहे. लॉकडाउनमुळे आपले दैनंदिन आयुष्य विस्कळीत झाले आहे हे सर्वांनाच मान्य असेल. अशा परिस्थितीत रिकामेपणा आणि विनाकारण काळजी कमी करण्यासाठी तुम्ही ज्या गोष्टी करू शकता त्यावर लक्ष द्या, सोशल मीडियाचा वापर कमी करा. परिस्थिती बदलणे आपल्या हातात नाही, परंतु आहे त्याकडे संधी म्हणून पहायचे की अडचण म्हणून हे नक्कीच आपण ठरवू शकतो. - डॉ. मुक्तेश दौंड, मानसोपचार तज्ज्ञ
------------
जेव्हा सर्व काही सुरळीत सुरू असते तेव्हा आपण आपल्या मनाप्रमाणे वागू शकतो, कुठेही फिरू शकतो. परंतु आता महिनाभरापासून आपल्याला कुठे जाता येत नाही. खरं म्हणजे ही आपल्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना आहे. तरी ही गोष्ट मनाविरुद्ध वाटते, त्यामुळे तणाव, उदासीनता, भीती, संशय, नैराश्य अशी भावना निर्माण होऊ शकते. यासाठी आपण आपल्या दैनंदिन जीवनाचे नियोजन करायला हवे.
- डॉ. महेश भीर,
मानसोपचार तज्ज्ञ
----------
कोरोनामुळे पुढे काय होणार, नोकरी टिकेल काय, उद्योग व्यवसाय चालेल काय? असे प्रश्न वारंवार मनात येऊ शकतात. त्यामुळे मानसिक दुर्बलतेतून शारीरिक दुर्बलता येऊ शकते. परंतु जे आपल्या हातात नाही त्याचा विचार करून उपयोग नाही. त्यामुळे काळजी करून काही होणार नाही. त्याऐवजी योग्य आहार घ्यावा, व्यायाम करावा, कुटुंबाशी संवाद साधावा, कोरोनासंबंधीच्या बातम्या वारंवार बघू नये, टीव्ही, मोबाइलचा अतिवापर टाळावा, नवनवीन गोष्टी शिकाव्यात आणि आपले आयुष्य निरोगी ठेवावे, म्हणजे भविष्यात आपल्याला आणखी चांगले काम करता येईल.
- डॉ. हेमंत सोननीस, मानसोपचार तज्ज्ञ